प्रभात वृत्तसेवा सातारा – सातारा शहराचे कारभारी बदलण्याचा निर्धार महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केला आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 25) पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ गांधी मैदानावर करण्यात येणार आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हे यांची सभा होणार आहे. महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आणि खा. कोल्हे यांच्या सभेच्या नियोजनासाठी आ. शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक राष्ट्रवादी भवनात झाली. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णादेवी पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने, लाडकी लेक अभियानाच्या अॅड. वर्षा देशपांडे, नरेंद्र पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुषमा राजेघोरपडे,आम आदमी पक्षाचे निवृत्ती शिंदे, विवेक कुराडे उपस्थित होते. गांधी मैदानावर होणारी सभा शहराचा कारभारी बदलण्यासाठीचा एल्गार असून, ही सभा मोठ्या ताकदीने आयोजित करण्याचा निश्चय महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी केला. या सभेस आमदार शशिकांत शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, सुवर्णादेवी पाटील, लक्ष्मण माने, शेकापचे जयंत पाटील, अॅड. वर्षा देशपांडे, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेत महाविकास आघाडीच्या प्रचाराची तुतारी फुंकली जाणार आहे. या सभेला आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केले आहे.