कराड – फलटण येथील यशवंत सहकारी बँकेतील सुमारे 112 कोटीच्या घोटाळाप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या पथकाने मंगळवारी पहाटे फलटणसह कराडमध्ये ठिकठिकाणी छापे टाकले आहेत. तसेच या घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या काहीजणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. यशवंत बँकेतील घोटाळाप्रकरणी कराड शहर पोलिसात काही महिन्यांपूर्वीच संचालक, बँकेतील अधिकाऱ्यांसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात ईडीने मंगळवारी पहाटेपासून छापासत्र सुरू केले आहे. बँकेच्या फलटण येथील मुख्य कार्यालयातही पथकाकडून छापा टाकण्यात आला. तेथून काही कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत, तर कराडात काहीजणांना या पथकाने ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.