Satara: आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सातारा जिल्हा राज्यात दुसरा
Satara सन २०२६-२७ मध्ये दि. २४ नोव्हेंबर २०२६ अखेर जिल्ह्यात एकूण १ हजार ४१२ प्रसुती झाल्या आहेत. यामध्ये कराड तालुक्यात २७६ तर खटाव तालुक्यात २५३ प्रसूती शासकीय आरोग्य संस्थांमध्ये झाल्या आहेत. या दोन्ही तालुक्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा राजू भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इतर तालुक्यांमध्येही शासकीय आरोग्य संस्थांतील प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न व आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Satara: महाराष्ट्र राज्यात आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये सातारा जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला असून ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश संपादन झाले आहे. यापुढेही आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासह शासकीय आरोग्य संस्थांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती राजू भोसले यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती सभागृहात आरोग्य समितीची मासिक बैठक पार पडली. यावेळी राज्यस्तरावरून ऑक्टोबर २०२६ अखेर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आरोग्य व्यवस्थापन व माहिती प्रणालीच्या अहवालानुसार आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सातारा जिल्ह्याने द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.
शासकीय आरोग्य संस्थांमध्ये प्रसुतीचे प्रमाण वाढविणे, माता व बालकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील नागरिकांचा विश्वास वाढविणे या उद्देशाने राजू भोसले यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनेचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.या योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा उपकेंद्र येथे प्रसूती झाल्यास संबंधित गरोदर मातेला ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शासकीय आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या मातांना प्रोत्साहन मिळणार असून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. दि. १५ ऑगस्ट ते २४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण ७७१ प्रसूती झाल्या आहेत. या योजनेतील लाभार्थींना अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना राजू भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांमार्फत अनुदान वितरणाची कार्यवाही करण्यात येत असून, सर्व पात्र लाभार्थींना वेळेत लाभ मिळावा यासाठी गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश देण्यात यावेळी देण्यात आले.या योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुती झालेल्या लाभार्थी श्रीमती दिपाली योगेश चव्हाण (ठोसेघर), श्रीमती उज्वला तानाजी वाघमळे (कण्हेर), श्रीमती वंदना सुरज गुप्ता (नागठाणे), श्रीमती शितल प्रदीप पाटोळे (नागठाणे) आणि श्रीमती साक्षी ओंकार प्रभावळे (खेड) यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
सन २०२६-२७ मध्ये दि. २४ नोव्हेंबर २०२६ अखेर जिल्ह्यात एकूण १ हजार ४१२ प्रसुती झाल्या आहेत. यामध्ये कराड तालुक्यात २७६ तर खटाव तालुक्यात २५३ प्रसूती शासकीय आरोग्य संस्थांमध्ये झाल्या आहेत. या दोन्ही तालुक्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा राजू भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इतर तालुक्यांमध्येही शासकीय आरोग्य संस्थांतील प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न व आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व आरोग्य केंद्रांमध्ये आंतररुग्ण व बाह्यरुग्ण सेवांची संख्या वाढविणे, प्रसूती सेवा अधिक सक्षम करणे आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी एचपीव्ही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना आवश्यक सूचना देण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले. या बैठकीस समितीच्या सदस्या सौ. राजेश्वरी भोसले, सौ. संध्यारजनी भोसले-पाटील, लालासाहेब जगदाळे, सौ. प्रियांका साळुंखे, शिवांजली भोसले, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, सर्व गटविकास अधिकारी तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.





