Satara : दिग्गजांच्या सोडचिठ्ठीने जिल्हा काँग्रेसची वाताहात

सातारा : सुमारे ६० वर्षे देशावर अधिराज्य गाजवणार्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची गेल्या पंधरा वर्षात मोठी पिछेहाट झाली. सातारा जिल्हा तर काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, या किल्ल्याचे अनेक बुरुज निसटून गेल्याने जिल्हा काँग्रेस खिळखिळी झाली. काँग्रेस पक्षाने अनेक आघात झेलले. अनेकजण स्वार्थ साधत दुसर्या पक्षात गेले. गेल्या काही दिवसात तर जिल्हा काँग्रेसला मोठी गळती लागत दिग्गजांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने जिल्ह्यात काँग्रेसची वाताहात झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना रोखण्याची महायुतीची रणनिती सध्या तरी यशस्वी होताना दिसत आहे. त्या तुलनेत काँग्रेस मात्र पडझड रोखण्यात अपयशी ठरत असल्याने पक्ष संकटात येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हाताचा पंजा चिन्हाची जादू जिल्ह्याने अनुभवली आहे. त्याकाळात काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची मोठी फौज होती. कसलाही स्वार्थ न ठेवता पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम होत होते. मात्र गेल्या १२ ते १५ वर्षात काँग्रेसला उतरती कळा आली. नरेंद्र मोदी यांच्या जादूने देशात भाजपची लाट उसळली. ही लाट काँग्रेस अडवू शकले नाही. परिणामी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहाचे राजकारण होवून अनेकजण काँग्रेस सोडून अन्य पक्षात गेले. दिवसेंदिवस अनेक राज्यातील सत्ता काँग्रेसने गमावली. देशपातळीवरुन ते गाव पातळीपर्यंत काँग्रेसची पिछेहाट झाली. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यात त्यांना फारसे यश आले नाही.
राहुल गांधी यांनी आक्रमकपणे देशात विविध ठिकाणी दौरे काढून काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पंतप्रधान मोदी व भाजपला शह देत सत्ता हस्तगत केली. या विजयाने देशात काँग्रेसचे संघटन सुरु झाले होते. लाेकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे काँग्रेसची ताकत जिल्ह्यात वाढली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे अपयश आले. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. पराभव जिव्हारी लागल्याने एकप्रकारे काँग्रेसला उतरती कळा लागल्याचेच चित्र होते.
या संकटातही सातारा जिल्हा काँग्रेसला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा ताकद देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकापोठोपाठ एक राजीनामे येवू लागल्याने जिल्हा काँग्रेस मोठ्या संकटात सापडली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते तथा पक्षाचे जिल्हा प्रभारी सचिन सावंत यांनीही जिल्ह्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेवून पक्षाची गळती रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश मिळाले नाही.
अंतर्गत कलहामुळे काँग्रेसची पिछेहाट
काँग्रेस पक्ष अडचणीत असतानाही निष्ठावंतांनी आजही काँग्रेसला उभारी देण्याचाच प्रयत्न केला आहे. अंतर्गत कलह, वादविवाद टाळत आता काँग्रेसने ‘हम साथ साथ है’चा नारा दिला आहे. प्रत्येक तालुक्यात पक्ष संघटन मजबुत करुन आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवून देण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसला आणखी मजबुती देण्याचा प्रयत्न होत असला तरी अंतर्गत कलहामुळेच पक्षाची पिछेहाट होताना दिसत आहे.
हाताच्या पंजाची जादू पुन्हा दिसणार का?
सातारा जिल्हा हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. सुमारे ५० ते ६० वर्षे काँग्रेस आणि हाताचा पंजा याचीच जादू होती. मात्र गेल्या १२ ते १५ वर्षात काँग्रेसची अपरिमित हानी झाली. अनेक संकटांचा सामना करत काँग्रेस पक्षाने पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे मजबुतीकरण सुरु आहे. जिल्हा व तालुकास्तरावर याबाबत नियोजन करण्यात येत आहे. या संकटात बालेकिल्ला मजबुत होणार का? हे आगामी काळातच दिसून येणार आहे.
या दिग्गजांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
अॅड. उदयसिंह पाटील, हिदूराव पाटील, अभिजीत पाटील, धनश्री महाडीक, धनाजी काटकर, संदीप चव्हाण,डॉ. संतोष गोडसे, नंदकुमार बावळेकर.





