सातारा : उरमोडीचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी

पाण्याअभावी पिके जळाल्यास आंदोलनाचा ‘स्वाभिमानी’चा इशारा
वडूज – खटाव तालुक्याच्या बहुतांश भागात पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या चार्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यासाठी उरमोडीचे आवर्तन तातडीने सोडावे. पाण्याअभावी पिके जळाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रशासनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारगाव आणि येळीव येथील तलावांनी तळ गाठला आहे. येरळवाडी तलावातील पाणी कमी होत आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पाटबंधारे विभागाने उरमोडीच्या पाण्याचे आवर्तन वेळेवर सोडणे गरजेचे होते; परंतु गेल्या तीन महिन्यांत एकही आवर्तन सोडले नाही. डिसेंबरमध्ये पाणी येणार असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, जानेवारीचा पहिला आठवडा उलटूनही पाणी आलेलं नाही.
उरमोडीचे आवर्तन सोडण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाकडून ठोस आश्वासन दिले जात नाही. दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन वेळेवर सोडणे आवश्यक आहे. उरमोडीचे पाणी न सोडल्यास ऊस, ज्वारी, हरभरा, कांदा व इतर पिके करपून जाण्याची भीती आहे. राजकीय दबावामुळे रब्बीचे आवर्तन फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाने पाणी न सोडल्यास, संघटनेच्यावतीने हजारो शेतकर्यांसमवेत आक्रमक आंदोलन करण्यात येईल. येत्या दोन-तीन दिवसात आवर्तन सुटले नाही, तर गाठ संघटनेशी आहे.
संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, खटाव तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे, खटाव-माण संपर्कप्रमुख शरद खाडे, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष वैभव पाटील, तालुका संघटक संतोष तुपे, संतोष बागल, युवा आघाडी तालुकाप्रमुख सचिन पवार यांच्या सह्या या निवेदनावर आहेत.
प्रभाकर घार्गे यांचे मानले आभार
राजकीय इव्हेंटसाठी आवर्तन पुढे ढकलण्याचा लोकप्रतिनिधींनी घातलेला घाट संघटना खपवून घेणार नाही. आवर्तन पुढे ढकलून पिके मातीमोल करण्याचा आणि शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कुणालाही नाही. पाणी कमी आल्याने ऊस गाळप हंगामात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली होती. पाणी तातडीने सोडण्याची मागणी त्यांनी केली. त्याबद्दल संघटनेच्या पदाधिकार्यांनी घार्गे यांचे आभार मानले आहेत.





