Satara Crime – सातारा शहरातील उपनगरात एका २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर सीताराम मतकर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना दि. ६ मे रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी तरुणी अपार्टमेंटसमोरील रस्त्यावरून जात असताना संशयिताने तिचा टीशर्ट पकडून खाली पाडले व तिला पकडून जवळ असलेल्या रस्त्यावर फरफटत ओढत नेल्याचा व तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. यावेळी संशयितांने तरुणीच्या डाव्या खांद्यावर व डाव्या मांडीवर जोरात चावा घेत तिला मिठी मारली. यावेळी तरुणीच्या उजव्या हाताला धरून ओढत ओरबडल्याने तिच्या हाताला जखम झाली आहे. ही घटना जागरूक नागरिकांनी पाहिल्यानंतर तरुणीला आरोपीच्या ताब्यातून सोडवण्यात आले. यावेळी जमावाने आरोपीला जागेवरच प्रसाद देत पोलीस स्टेशनला आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकारामुळे तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य झाल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी घटनास्थळावरून माहिती घेऊन पोलिसांनी संशयित अमर सिताराम मतकर (रा. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ व ११५(२) अन्वये नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करत आहेत.