प्रभात वृत्तसेवा कोरेगाव – एकंबे, ता. कोरेगाव येथे राहत्या घराच्या अंगणात घडलेल्या वादातून महिलेसह तिच्या पतीवर झालेल्या मारहाणीप्रकरणी आई आणि मुलाविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मारहाण तसेच दमदाटी केल्याचे नमूद करण्यात आले आहे.याबाबत पोलीस ठाण्यातून रविवारी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार शुभांगी समीर चव्हाण, (रा. एकंबे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ते सायंकाळपर्यंतच्या वेळेत घरासमोरील अंगणात मुलाला समज देत असताना आरोपी संगिता विजय चव्हाण यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. यानंतर संगिता चव्हाण आणि त्यांचा मुलगा विशाल यांनी संगनमत करून फिर्यादी व तिच्या पतीला दमदाटी केली. वाद अधिक बळावल्याने विशाल चव्हाण याने दगड व वीट उचलून फिर्यादीच्या पतीवर हल्ला केला. त्यांच्या छातीवर, डाव्या गुडघ्यावर व पायावर मार लागून दुखापत झाली. संगिता चव्हाण यांनी लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या पतीच्या पाठीवर मारले आहे. घराबाहेरील तीन मोटारसायकली व पाण्याच्या पिंपाचेही नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात विशाल विजय चव्हाण व त्याची आई संगिता विजय चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार संदीप माने व अंमलदार सुरज कर्णे तपास करत आहेत.