Satara: आर्थिक फायद्यासाठी लॉजवर वेश्या व्यवसाय चालविणार्या पाचजणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आले आहे. शहरातील हॉटेल वारणा लॉज याठिकाणी छापा टाकून गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. लॉजमालक बिलाल पठाण (वय 35, रा. मंगळवार पेठ, कराड), व्यवस्थापक हर्षवर्धन माणिक कांबळे (वय 20), ओंकार सुनील कांबळे (वय 25, दोघेही रा. सुरूर, ता. वाळवा, जि. सांगली), प्रमोद सातपुते, मनोज कांबळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉजवर चालविल्या जाणार्या वेश्या व्यवसायावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर अधीक्षक वैशाली कडूकर तसेच उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी दिल्या होत्या. कराड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना हॉटेल वारणा लॉजवर वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आमले, उपनिरीक्षक निखिल मगदूम, मारुती चव्हाण, हवालदार अशोक वाडकर, सतीश पाटील, पोलीस नाईक सज्जन जगताप, मुकेश मोरे, अमोल देशमुख, निलेश विभुते, सोनाली पिसाळ यांच्यासह पथकाने गुरुवारी रात्री डमी ग्राहक पाठवून वारणा लॉजवर वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची खात्री केली. त्यानंतर लॉजवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी त्याठिकाणी दोन मुली आढळून आल्या. त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती चौकशीतून समोर आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आमले यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.