खंडाळा – वडवाडी (ता. खंडाळा) येथे तरुणीला गळफास लावून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विशाल दिलीप बामणे व रेश्मा विशाल बामणे या दाम्पत्याला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वडवाडी येथे पीडित युवती मयुरी जाधव (वय २१) दि.३० रोजी घरी एकटी असताना संशयित विशाल व त्याची पत्नी रेश्मा या दोघांनी घरात येत ” तू विशालला दोन लाख रुपये दिले नाही तर तू पाठवलेले मेसेज व्हायरल करू ” अशी धमकी दिली. यावेळी पैसे न मिळाल्याने या दोघांनी पीडित युवतीला जिवे मारण्याच्या उद्देशाने साडीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला. याबाबत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार या दाम्पत्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कामठे तपास करत आहेत.