नागठाणे : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे यांच्या माध्यमातून आयोजित जनता दरबारात जनता दरबारमध्ये २०० पेक्षा जास्त प्रश्नांचे निवारण करण्यात आले. या पुढेही जनता दरबारात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे, अशी ग्वाही आ. मनोज घोरपडे यांनी दिली. उंब्रज येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात दि. ९ रोजी झालेल्या जनता दरबाराप्रसंगी तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, महेशबाबा जाधव, संपतभाऊ जाधव, सुरेशतात्या पाटील, शंकरकाका शेजवळ, माणिक जाधव, विजय जाधव यांची उपस्थिती होती. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोल्हाटी समाजातील ३६ लाभार्थ्यांना नवीन रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. श्रावणबाळ योजनेतर्गत निराधार महिलांना पेन्शनचे वाटप करण्यात आले. महसुली मृत खातेदारांच्या वारस नोंदी करण्यात आल्या. त्याचबरोबर महसूल, शैक्षणिक, भूमापन इत्यादी विभागातील प्रकरणे निकाली काढण्यात आली. हणबरवाडी उपसा सिंचन योजनेचे पाणी मसूर विभागाला व धोम डाव्या कालव्याचे पाणी वाठार व रहिमतपूर विभागाला दिल्याबद्दल आ. घोरपडे यांचा शेतकऱ्यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. आ. मनोज घोरपडे म्हणाले, जनता दरबारमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायमच मी कटिबद्ध असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाधान करणे. त्याचबरोबर त्याची छोटी मोठी प्रकरणे निकाली काढण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. यावेळी विलास आटोळे, दिगंबर भिसे, प्रशांत भोसले, जयवंत जाधव,विनायक जाधव, चंद्रकांत जाधव, महेश जाधव, शहाजी आप्पा मोहिते, प्रतिभा कांबळे, यांच्यासह भाजप पदाधिकारी, नागरिक, महिला उपस्थित होत्या.