Satara : बंद नेटवर्कमुळे बामणोलीच्या पर्यटन वाढीस खीळ

बामणोली : बामणोली हे उपमुख्यमंत्र्यांच्या विभागातील नामांकित पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. मात्र, या ठिकाणी मोबाईल कंपनीच्या नेटवर्कचीची बोंबाबोब आहे. बीएसएनएल व जिओच्या बंद नेटवर्कमुळे बामणोलीच्या पर्यटन वाढीस खीळ बसली आहे. मोबाईल कंपन्यांची मनमानी सुरु असून आठ आठ दिवस नेटवर्कच मिळत नसल्याने नागरिकांसह पर्यटकही त्रस्त आहेत. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चार मंत्री महोदयांनी यात लक्ष घालून बामणोली विभागाची समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सध्या बामणोली परिसरामध्ये बीएसएनएल कंपनीचा फळणी येथे तर जिओ कंपनीचा टॉवर म्हावशी येथे उभारण्यात आलेले आहेत. बामणोली परिसरामध्ये बीएसएनएल कंपनीचे नेटवर्कचे जाळे होते. त्यामुळे लोकांनी बीएसएनएलचे मोबाईल घेतले. परंतु, सध्या बीएसएनएलचे नेटवर्क दिसत तर आहे पण फोन लागत नाही. लोकांनी महिनाभराचे रिचार्ज नेटवर्कच्या अभावी वाया जात आहेत. त्याच्याशी कंपनीला काही घेणे देणे नाही.
कंपनीच्या अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता रस्त्स्याचे काम सुरू आहे, किंवा नवीन टॉवरची काम सुर आहेत त्यामुळे नेटवर्क नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. बामणोली हे पर्यटन क्षेत्र असून बामणोलीमध्येच नेटवर्क नाही इतर गावांमध्ये टॉवर उभे केले जातात. उभे केलेल्या टॉवरवरून जवळच्या गावांनासुध्दा नेटवर्क येत नाही. बीएसएनएल कंपनीचा नवीन टॉवर फळणी या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. परंतु, त्या टॉवरचे नेटवर्क बामणोली, सावरी म्हावशी, तेटली, पावशेवाडी, मजरे शेंबडी, देवाची शेबंडी व बामणोली परिसरातील इतर गावांना ही पोहचत नाही. अशीच काहीशी अवस्था म्हावशी येथील जिओ कंपनीच्या टॉवरची आहे. हा टॉवर म्हावशी गावामध्ये डोगंराच्या पायथ्याला उभारण्यात आलेला आहे. मात्र, त्याच गावात नव्हे तर इतर जवळच्या गावांना या हया टॉवरचे नेटवर्क मिळत नाही.
अत्यावश्यक सेवाही नेटवर्कवर अवलंबून आहेत. परंतु, कोणी उपचाराअभावी आपला जिव गमवाला तरी त्याच्याशी या कंपनीवाल्यांना काही एक घेणे देणे नाही. लोकांनी नेटवर्क कपंनीचे मोबाईल तर घेतले रिचार्ज पण वेळेत मारतात. नाही मारला तर मोबाईल बंद मग नेटवर्क नसेल तरी त्याला कोणाला दोषी ठरवणार. रिचार्ज मारणारा मोबाईलधारक की कंपनी याला जबाबदार कोण, बीएसएनएल कंपनी व जिओ कंपनी च्या अधिकारी बामणोली परिसरातील लोकांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत.
अंधारीतील टॉवर बंद अवस्थेत
बामणोली परिसरामध्ये बीएसएनएल कंपनीचा अंधारी येथे एकच टॉवर आहे. या टॉवरचे नेटवर्क बामणोली, पावशेवाडी, मजरे शेबडी, देवाची शेंबडी, वाघळी, मुनावळे, काळकोशी, आंबवडे, जाधव उंबरी, अंधारी, सावरी, तेटली, दरे, पिंपरी, शेल्टी इत्यादी गावांना मिळते. परंतु, सध्या दिवस-दिवस अंधारी येथील टॉवर बंद असतो. बर्याच वेळा नेटवर्क नसल्यामुळे आजारी व्यक्तीना वेळेत उपचार मिळत नाही. एकमेकांशी सवांद साधता येत नाही.
आंदोलनाचा नागरिकांचा इशारा
बामणोली हे पर्यटनसाठी प्रसिद्ध आहे. सध्याच्या काळात सर्व क्षेत्रामध्ये ऑनलाइन पद्धतीमुळे सर्व व्यवहार व बुकिंग सुद्धा ऑनलाइन होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी बोटिंग व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, टेंट व्यवसाय व पर्यटनावर अवलंबून असणारे छोटे मोठे व्यवसायिकांना नेटवर्क नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिवस दिवस नेटवर्क नसल्यामुळे संपर्क कमी होतो त्यामुळे पर्यटनावर आधारित व्यवसाय अडचणीत आहे. यामुळे बामणोली विभागात मोबाईल कंपन्यावर कारवाईची मागणी होत आहे. याबाबत दखल न घेतल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.





