Satara Civil Hospital – जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री असतानाही आरोग्यासारख्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या आणि गंभीर विषयाकडे कुणाचेच लक्ष राहिले नसल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील यंत्रणेची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कुणाचाच कुणाला पायपोस नसल्यामुळे आणि मुख्य म्हणजे मंत्र्यांचेही नियंत्रण नसल्यामुळे नोकरशाहीची यंत्रणा किती बेलगाम वागू शकते, याचे उदाहरणच जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराच्या निमित्ताने उघड झाले आहे. मंत्रिमहोदयांनाही आपल्या राजकारणातून सवड मिळत नसल्याने लोकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेली ही यंत्रणा लोकांच्या जीवाशी खेळण्याचे धाडस करु शकते अशी तऱ्हाही महाराष्ट्राने सातारा जिल्ह्यातच पाहिली आहे. अर्भक मृत्यू प्रकरण असो किंवा दलालांचा सुळसुळाट असो या सर्वांमध्ये शुक्रवारी लाचलुचपतप्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईने कढी केली आहे. या अशा गोष्टी केवळ काही महिन्यांत होत नाहीत. अनेक वर्षांपासून या रुग्णालयात दलालीपासून खाबुगिरीपर्यंत काय काय जोपासले जातेय, याकडे कुणाचेच लक्ष नाही, हे या जिल्ह्यातील जनतेचे दुर्दैव आहे. राज्यात सत्ता काँग्रेस आघाडीची असो की महायुतीची. कोणाचीही सत्ता असो. सातारा जिल्हा मंत्रिमंडळाचा कणा असतो, असा फुकाचा अभिमान सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात नेहमीच असतो. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्याच्या राजकारणात सातारा नेहमीच अग्रेसर राहिला आहे, अशा गप्पाही आपण मारतो. त्या गप्पात तथ्यही आहे, असेल. परंतु, राज्यात राजकीय दबदबा असून जिल्ह्यातील लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार होत असतील तर त्या राजकीय वर्चस्वाचा उपयोग काय असा प्रश्नही उपस्थित होत आहे. राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळापासून सातारा जिल्ह्यातील मंत्री राज्याच्या राजकारणावर आपला प्रभाव टिकवून आहेत. यावेळी तर महायुतीची सत्ता येताच जिल्ह्यातील चार जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली. सातारा जिल्हा रुग्णालय. यापूर्वी जिल्ह्याला अशी भरभक्कम साथ कधीच मिळाली नाही. त्यामुळे जनतेच्या अपेक्षाही वाढल्या होत्या. त्याप्रमाणे कामाला सुरवातही झाली होती. जिल्ह्याच्या विकासासाठी कोटीच्या कोटी उड्डाणांचा निधी मिळाल्याचेही अधूनमधून लोकांच्या कानावर येत राहिले. असा काहीसा दिलासा मिळत असतानाच एका बाजूने जिल्हा रुग्णालयासारख्या महत्त्वपूर्ण संस्थेचे वाभाडे निघत असताना चारही मंत्र्यांचे या रुग्णालयाच्या कारभाराकडे दुर्लक्ष झाले असे म्हणावे की जिल्ह्यातील ठराविक विभाग वगळता प्रशासनावर चारही मंत्र्यांची पकड राहिली नाही असे म्हणावे याबाबत लोकांच कोड्यात पडले आहेत. आरोग्यसेवेचे आणखी वाभाडे निघालेले पाहण्यापेक्षा आतातरी चौघांनीही लक्ष घालून या जिव्हाळ्याच्या आरोग्यसेवेला सलाइनचा योग्य डोस देऊन जिल्हा रुग्णालयाचा कारभार लोकाभिमुख होण्यासाठी काही करावे, अशी लोकांची अपेक्षा पूर्ण करायला हवी. अन्यथा चार कॅबिनेट मंत्री असूनही जिल्ह्याच्या नशिबी सर्वच बाबतीत अनारोग्याचा फैलाव व्हावा अशी स्थिती होईल आणि साताऱ्यासारख्या विकासाकडे जाण्याचा नावलौकिक असलेल्या जिल्ह्याला आणखी नामुष्कीचे दिवस येऊ नयेत, अशी अपेक्षा बाळगली तर ती चुकीची ठरु नये. गैरप्रकारांची वाळवी रोखणे गरजेचे जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्री असतानाही रुग्णसेवेची ही अवस्था असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा रुग्णालय समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री आणि सचिव म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखालील व्यवस्थेत असे प्रकार घडणे ही गंभीर बाब मानली जात आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, लोकांना आरोग्यसेवा देण्यात जिल्हा कमी पडेलच पण अनेक गैरप्रकारांची लागलेली वाळवी एक यंत्रणाच नव्हे तर सारा जिल्हाच पोखरु लागला तर होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागणार नाही.