Satara Civil Hospital – क्रांतीसिंह नाना पाटील सातारा जिल्हा रुग्णालय सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडले असून रुग्णसेवेपेक्षा दलाली आणि लाचखोरीचे जाळे अधिक बळकट झाल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. अलीकडील लाच प्रकरणानंतर रुग्णालयातील कथित गैरप्रकारांचा बुरखा फाटला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयात मेडिकल बिल मंजुरी, अपंगत्व प्रमाणपत्र, विविध परवानग्या यासाठी ठराविक ‘दर’ आकारले जात असल्याची चर्चा असून ५० हजारांपासून ते ५ लाखांपर्यंत व्यवहार होत असल्याचे आरोप आहेत. यामध्ये दलाल आणि काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना विनामूल्य मिळणाऱ्या सेवांसाठीही पैसे मोजावे लागत असल्याची तक्रार आहे. यापूर्वीही तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या कार्यकाळात मृतांची अदलाबदल आणि अर्भक मृत्यू प्रकरणांमुळे रुग्णालय वादात सापडले होते. त्यातच आता परवान्यासाठी ५० हजारांच्या लाच प्रकरण पुढे आल्याने प्रशासनातील अनियमिततेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत आनंद वाळवेकर यांचे नाव समोर आले असले, तरी हा प्रकार केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून त्यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणात ‘बोलवता धनी’ कोण, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. दरम्यान, रुग्णालयाचा कारभार सध्या ‘प्रभारी राज’मध्ये अडकला आहे. डॉ. राहुल जाधव यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार असून प्रशासकीय जबाबदारी डॉ. स्मिता लोंढे यांच्यावर आहे. छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. विनायक काळे यांची भूमिका मात्र केवळ कागदोपत्री असल्याची टीका होत आहे. समन्वयाच्या अभावामुळे प्रशासनावर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. काही अधिकाऱ्यांच्या बदली आदेशांनंतरही ते त्याच ठिकाणी कार्यरत असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशालाच आव्हान दिले जात असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील शिस्त आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.