सातारा : विविध समस्यांबाबत नागरिकांंची आ.शिवेंद्रराजे भोसले यांना साकडे

विसावा पार्क परिसरातील समस्यांचे मांडले गार्हाणे
कृष्णानगर : येथील सातारा – कोरेगाव रस्त्यावर असलेल्या विसावा पार्क परिसरातील विविध समस्या निर्माण झाल्या असून त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी याबाबत कार्यवाही होत नसल्याने आ. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली व त्यांच्याकडे समस्यांचे गार्हाणे मांडून त्या सोडवण्यासाठी साकडे घातले. दरम्यान, आ शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबतीत संबधित सर्व विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेवून कायम स्वरुपी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.
याबाबत अधिक माहिती अशी, विसावा प्रभाग 16 मध्ये विसावा नाका, विसावा पार्क, गोरखपूर, पिरवाडी, गुलमोहोर कॉलनी या भागाचा प्रामुख्याने समावेश होतो. हा भाग त्रिशंकू भागात होता. मात्र, आता हा भाग नगरपरिषेद हद्दीत समावेश झाला आहे. हद्दवाढ होवूनही हा प्रभाग मूलभूत नागरी सुविधापासून वंचित आहे. समस्यांबाबत अनेकवेळा पाठपुरावा करून सुद्धा ठिम्म प्रशासन हालत नव्हते म्हणून आज येथील संतप्त झालेल्या नागरिकांनी आ शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या भागात सातारा-कोरेगाव रस्तावरील वाढणारी अतिक्रमणे विशेषतः फळ गाडीवाले व खाद्य विक्रेते तसेच हातगाडीवाले रस्त्यावर कचरा टाकत असल्याने भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले असून या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, अंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईन 4 इंची करणे, समाजमंदिर, जीम, बाग, देवालय याची उभारणी करणे तसेच या भागात हॉस्पीटल कॉलेज व्यापारी संकुले असल्याने सिग्नल व भुयारी मार्ग उभारणे आदी मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी समाजसेवक रवी पवार, विसावा पार्क मैत्री पार्कचे राजा रानडे तसेच महिला, नागरिक व युवक उपस्थित होते.





