सातारा : गणेश विसर्जनासाठी नागरिकांना नदीपात्रात येण्यास मनाई

शहरात 21 ठिकाणी जलकुंडांमध्ये विसर्जनाची सोय; मूर्ती संकलनासाठी वाहनांचीही व्यवस्था
कराड (प्रतिनिधी)- सर्वांच्या लाडक्या गणरायाचे शुक्रवारी मोठ्या उत्साहात आगमन झाले. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कराड पालिकेने नेटके नियोजन केले आहे. दीड दिवसांच्या गणरायांना शनिवारी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी नागरिकांना नदीपात्रात येण्यास मनाई करण्यात आल्याने गणेश विसर्जनासाठी कराड शहरात विविध 21 ठिकाणी जलकुंडात गणेश विसर्जन करण्याची सोय नगरपालिकेने केली आहे. अनेक ठिकाणी असणाऱ्या कारंज्यांचा वापरही गणेश विसर्जनासाठी करण्यात येणार आहे तर काही ठिकाणी लोखंडी जलकुंड ठेवण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या वतीने शहरात याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे.
दिड वर्षापासून देशासह जिल्ह्यात करोना महामारी आहे. अशातच राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यातच गणेशोत्सव सुरू झाला आहे. उत्सवप्रियतेमुळे अनेकजण एकत्रित येण्याची शक्यता जास्त असते. त्यातून करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यासाठी प्रशासनाने गणेश मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला मंडळांनीही प्रतिसाद दिला आहे.
शहरातील अनेक मंडळांनी नेहमीप्रमाणे स्टेज न उभारता रस्त्यात अडथळा होणार नाही अशा जागी तसेच मंदिरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणेश आगमनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होते. त्यानंतर पाच, सात व दहा, बारा दिवसांनी गणेश मूर्तींचे विसर्जन होते. येथील कृष्णा व कोयना नदीपात्रावर अनेक नागरिकांची विसर्जनासाठी गर्दी होते. मात्र, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नदीपात्रावर येण्यास लोकांना मज्जाव केला आहे. तेथे फक्त पालिका कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांनी आणलेल्या मुर्तींचे विसर्जन करणार आहेत.
गणेश विसर्जनासाठी नागरिकांना नदीपात्रात येण्यास मनाई करण्यात आल्याने गणेश विसर्जनासाठी कराड शहरात प्रत्येक प्रभागामध्ये पालिकेचे वाहन फिरणार आहे. मुर्ती संकलनासाठी पालिकेचे शंभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह ठिकठीकाणी जलकुंड पालिकेने ठेवले आहेत. त्यातही अनेक नागरिक गणेशमूर्तींचे विसर्जन करू शकतात.
शहरात आकर्षक कारंजे पालिकेने तयाक केले आहेत. त्या कारंज्यांचा वापरही गणेश विसर्जनासाठी करण्यात येणार आहे तर काही ठिकाणी व लोकवस्तीत असलेल्या चौकात लोखंडी जलकुंड ठेवण्यात आले आहेत. नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डाके यांनी केले आहे.
दरम्यान, दिड दिवसांच्या गणेशाचे ही विसर्जन शनिवारी करण्यात आले. मूर्ती संकलन वाहने शहरातून फिरत असून ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या जलकूंडातील, नागरिकांनी सूपूर्द केलेल्या मूर्तींचे ही बोटीतून नदीपात्रात विसर्जन करण्यात आले.





