Satara : जिल्हा परिषद शिक्षकांवर शाळाबाह्य कामांचे ओझे

भुईंज : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना जनगणना, मतदार नोंदणी, ऑनलाइन माहिती भरून देणे, विविध योजनांचे सर्वेक्षण यासारख्या जबाबदार्या पार पाडाव्या लागत आहेत. हे काम वेळखाऊ असल्याने शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. शाळाबाह्य कामांच्या ओझ्यामुळे शिक्षकांचे विद्यार्थ्यांना शिकवण्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहेत.
ग्रामीण आणि निमशहरी भागातील शाळांमध्ये शिकवणार्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची जाणीव आणि त्यामध्ये यश मिळवण्याची उमेद वाढत आहे. मात्र, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि पुरेसे शिक्षण शाळेत मिळत नसल्याने, ते खाजगी अॅकॅडमींवर अवलंबून राहू लागले आहेत. कारण, शाळेतील शिक्षकांवर शासकीय कामांचे ओझे असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विशेषतः ज्येष्ठ शिक्षकांना मोबाइल अॅप्स, टॅब्लेट, संगणक यावर सहज काम करता येत नाही.
परिणामी शिक्षकांना वेळ मिळत नाही. काही विद्यार्थी शाळेतील शिकवणे फारसे गांभीर्याने घेत नाहीत. ही परिस्थिती गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संकल्पनेला आव्हान देत आहे. नवोदय, शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, एनएमएमएस, सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा पाचवी ते दहावीदरम्यान घेतल्या जातात. या परीक्षांची माहिती, मार्गदर्शन, सराव प्रश्नसंच, वेळेचे व्यवस्थापन यासारख्या गोष्टींचा शाळांमध्ये अभाव दिसून येत आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना खाजगी क्लासेस लावताना दिसतात. मात्र, खाजगी क्लासेसची फी सर्वसामान्य पालकांना परवडणारी नसल्याने, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील हुशार मुले स्पर्धेत मागे पडत आहेत. ग्रामीण भागातील अपवादात्मक जिल्हा परिषद शाळांनी हे चित्र पालटले आहे.
शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ, स्वायत्तता आणि तांत्रिक कौशल्ये दिल्यास, अशी कामगिरी सर्वत्र साध्य होऊ शकते. काही शिक्षकांनी आपल्या पातळीवर हे साध्य करून दाखवले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी या शिक्षकांना शाळाबाह्य शासकीय कामातून मुक्त करावे, अशी मागणी जोर धरत आहे.





