सातारा – म्हसवड, दहिवडी, वडूजमध्ये होणार ‘लाडक्या बहिणीं’चा भाजपतर्फे आयोजन

सातारा – राज्यातील माता-भगिनींच्या सन्मानार्थ आणि कल्याणासाठी महायुती सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ माण-खटाव मतदारसंघातील हजारो महिलांना होत आहे. या सर्व माता-भगिनींचा सन्मान सोहळा आणि ‘हास्यजत्रा’फेम कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम भाजपच्यावतीने म्हसवड, दहिवडी, ता. माण आणि वडूज, ता. येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे यांनी दिली. म्हसवड येथे उद्या, दि. 29 रोजी हा सोहळा होणार आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींना आपल्या कुटुंबांचा चरितार्थ सन्मानाने चालवता यावा म्हणून महायुती सरकारने महिलांना दरमहा दीड हजार रुपये सन्मान निधी देणे सुरू केले आहे. आतापर्यंत तीन महिन्यांचा मिळून साडेचार हजार रुपयांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा झाला आहे. माण-खटाव मतदारसंघातील 60 हजारांपेक्षा अधिक महिलांनी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत नोंदणी केली आहे.
वयोश्री योजनेतूनही लाभार्थ्यांना लाभ होत आहे. मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे. या सर्व महिलांच्या सन्मानासाठी म्हसवड येथील शिक्षक कॉलनीत उद्या, दि. 29 रोजी सकाळी 11 वाजता, दहिवडी येथील क्रीडा संकुलातील मैदानावर दि. 2 ऑक्टोबर रोजी आणि वडूज येथील एसटी डेपोशेजारील मैदानावर दि. 6 ऑक्टोबर रोजी माता-भगिनींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सिनेसृष्टीतील आणि ‘हास्यजत्रा’फेम कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांना आमदार जयकुमार गोरे, सोनिया गोरे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश सत्रे यांनी दिली.





