Satara : कराड दक्षिणेतून भाजपचा जिल्ह्यावर स्ट्राइक…

सातारा : पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत भल्याभल्यांना चकवा देत भारतीय जनता पक्षाने कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार डॉ. अतुल भोसले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करत धक्कातंत्र वापरले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन जिल्ह्याला तरुण उमदा चेहरा पुढे आणून भाजपने वेगळी खेळी खेळली आहे. अर्थातच डॉ. अतुल भोसले यांनी आता प्रत्येक तालुक्याच्या मैदानावर उतरुन संपर्क वाढवून पक्ष मजबूतीसाठी ही नवी जबाबदारी पेलण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे.
विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपचा जिल्हाध्यक्ष आपल्याच मर्जीतील व्हायला हवा, असे प्रमुख नेत्यांना वाटणे साहजिक होते. त्यामुळे तशा हालचालीही मोठ्या प्रमाणावर झाल्या. इतर पक्षांच्या तुलनेत भाजपमध्ये अजूनही पक्षातील पदाधिकाऱ्यांना महत्त्व दिले जात असल्याने आपल्या पक्षावर आपलीच कमांड हवी, यासाठी अनेकांनी आपले सर्व डावपेच पणाला लावले. अनेकांची नावे चर्चेतच राहिली. आणि चर्चेत नसणारे डॉ. अतुल भोसले जिल्हाध्यक्ष झाले. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणाला पूर्वी कधीच नव्हती अशा कलाटणी मिळाली.
काँग्रेस विचाराच्या या जिल्ह्यात आठही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असे भाजपलासुद्धा वाटले नसेल. पण भाजपचे चार, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दोन असे आठही आमदार महायुतीने मिळवले. त्यापूर्वी लोकसभेत सातारा मतदारसंघतून भाजपला उदयनराजे भोसले यांच्या रुपाने पहिला खासदार मिळाला होता. भाजपला ताकद दिली म्हणून भाजपनेही सत्तेत आल्यावर चार कॅबिनेट मंत्रिपदे देऊन आपला मनसुबा दाखवला. आता त्यांना पूर्ण जिल्ह्यावर आपल्याच पक्षाचे वर्चस्व असावे असे वाटणे साहजिक आहे. त्यासाठी आगामी निवडणुकांना ते ताकद देतील, अशी शक्यता आहे. आणि जिल्ह्यातील सर्व सत्तास्थानी वर्चस्व मिळवायचे असेल तर तसा ताकदवान अध्यक्ष शोधण्याची गरज होती. त्यामुळेच चर्चेतही नसणाऱ्या डॉ. अतुल भोसले यांना संधी मिळाली.
अर्थातच डॉ. अतुल भोसले यांनी गेल्या दहा वर्षांत पक्षासाठी केलेले काम ही त्यांची जमेची बाजू आहेच.
जय- पराजयाचे अनुभव घेत अतुल भोसले यांचा प्रवास सुरु असताना त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि पक्षानेही त्यांना वेळोवेळी ताकदही दिली. कराड उत्तरमधून एक आणि कराड दक्षिणमधून दोन अशा तीन निवडणुकीत हार पत्करल्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करुन ते जायंट किलर ठरले. त्यांचा हा विजय कष्टाचा होता. पाच वर्षे घेतलेल्या मेहनतीचा होता. निवडून आल्यावरही आपल्या मतदारसंघात विकास कामांवर भर देत आपला मुत्सद्दीपणा दाखवला आहे. भाजपच्या वरिष्ठांनी हे ओळखले. मतदारसंघात त्यांची बाजू आता भक्कम झाल्याने आता ते जिल्ह्यात पायाला भिंगरी बांधून फिरू शकतात. मतदारसंघातील राजकीय इर्ष्येमुळे राजकारणात गोळाबेरीज कशी करायची याबाबतचा त्यांचा मिळालेल्या अनुभवाचा फायदाही घ्यायचा आहे.
कृष्णा उद्योग समूहामुळे त्यांच्या पाठीशी असणारी सर्व ताकद भाजपला माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात हाच चेहरा जिल्ह्यातील राजकीय प्रभाव निर्माण करण्यासाठी ताकदवान ठरु शकेल, हाच अंदाज बांधून ही निवड झाली. ही निवड सार्थ करण्यासाठी ते आता जीवाचे रान करतील, अशीच शक्यता आहे. कारण ही जबाबदारी यशस्वी केली तर पुढील काळात राज्याच्या राजकारणातही खूप काही करण्याची संधी मिळू शकते, असे गणितही त्यांच्या हिशोबात असणार आहे. त्यामुळे भाजपने जिल्ह्याच्या दक्षिणेकडील टोकाकडून केलेला अनपेक्षित स्ट्राइक विचारपूर्वक केला आहे. पक्षाच्या मजबुतीकरणासाठी त्याचा उपयोग होईल याची खात्री भाजपला आहे. असे असले तरी त्यांच्या अध्यक्षपदाचा उपयोग जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल, असे काम करण्याची लोकांची अपेक्षा आहे, हेही डॉ. अतुल भोसले यांनी विसरता कामा नये.
आता प्रवास जिल्ह्याच्या राजकारणात…
आता आपण फक्त कराड दक्षिण मतदारसंघापुरते नाही. मतदारसंघाबरोबरच पूर्ण जिल्हाच आपला मतदारसंघ बनला आहे, हे लक्षात घेऊऩ डॉ. अतुल भोसले यांना काम करण्याची गरज आहे. एका अर्थाने डॉ. अतुल भोसले यांचा जिल्ह्याच्या राजकारणातील वेगळा प्रवास सुरु झाला आहे किंवा भाजपने जाणूनबुजून ही खेळी केली आहे, असे म्हणण्यास वाव आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व पातळीवरील नेते कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणे, नव्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सन्मान देणे हे करत असतानाच महायुतीमधील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याची जबाबदारीही अतुल भोसले यांना पेलावी लागणार आहे.
सर्व स्तरावरील संपर्कावर भर देणे अपरिहार्य
जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली म्हणजे डॉ. अतुल भोसले यांना जिल्ह्याच्या प्रत्येक भागात संपर्क वाढविण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. जिल्ह्याच्या सर्व भागात जाणे अपरिहार्य असून त्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रमुख नेते, कार्यकर्ते, खेड्पाड्यातील नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वाशी स्नेह वाढवणे क्रमप्राप्त आहे. पक्षाने सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी ते आता झटतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही जबाबदारी पेलायची आहे. विधानसभेच्या मैदानापेक्षा या निवडणुका वेगळ्या असतात. स्थानिक परिस्थितीवर आधारित राजकीय डावपेच आखत त्यांना पक्ष मजबूत करायचा आहे. निवडणुकीसाठी अवधी असल्याने तोपर्यंत डॉ. अतुल भोसले सर्वांचाच आवाका ओळखून आपले स्वतःचे अस्तित्व जिल्हाभर वाढवतील, अशाच दृष्टीने त्यांची वाट चालतील आणि अपेक्षा पूर्ण करतील, असे भाजपच्या वरिष्ठांना वाटत असल्यानेच त्यांच्यावर पक्षाने ही निवड करुन विश्वास दाखवल्याची चर्चा आहे.





