Satara : वणव्यात होरपळतेय जैवविविधता

महाबळेश्वर : जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ तसेच जैव विविधतेचा एक महत्वाच केंद्र म्हणून पाचगणी, महाबळेश्वरकडे पहिले जाते. परंतु, ज्या निसर्गामुळे पर्यटक या पर्यटन स्थळाल भेट देतात. त्यावर आपला उदरनिर्वाह चालत असतो अशा निसर्गाची निगा राखण्याचे सोडून त्याला हानी पोहचविण्याची प्रथा काही व्यक्तीकडून वर्षानुवर्षे सुरु आहे. वणवा ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. वणवा लावण्यासाठी टाकलेल्या एका काडी पुढे वनविभाग, निसर्ग रक्षणासाठी झटणाऱ्या अनेक सामाजिक संस्था देखील हतबल झाल्या आहेत. सध्या जैवविविधता वणव्यात होरपळत असून वाई-महाबळेश्वर-पाचगणी – मेढा भागात विशेष लक्ष्य देण्याची गरज आहे. वणवा लावणाऱ्यांन ना कारवाईची भीती, ना वनविभागाचे भय ही भयानक परस्थिती अशीच राहिली तर या भागातील जनतेला याची मोठी किंमत नक्कीच मोजावी लागणार आहे.
पाचगणी, महाबळेश्वर या भागात विविध प्रकारची दुर्मिळ झाडे पक्षी तर खवले मांजर जंगलींकुत्री पिसोरी वाघाटी बिबट सांबर भेकर शेकरू विंचू साप असे विविध प्रकारचे दुर्मिळ प्राणी देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. यातच अलीकडे महाबळेश्वरमध्ये अतिदुर्मिळ पांढऱ्या शेकरू तर पाचगणीमध्ये पांढऱ्या संवादाचे अस्तित्व समोर आले आहे. परंतु, वणव्यामुळे अशा जैव विविधतेचे नुकसान होत असून त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. वर्षानुवर्ष डिसेंबर ते मे दरम्यान हे वणवे लावले जातात परंतु आज पर्यंत वणवा या समस्ये वरती वनविभागाला कोणताच ठोस उपाय मिळाला नाही.
वणवा या भयानक समस्येवर फक्त वनविभागच नाहीतर नगरपरिषद महसूल विभागाने देखील उपाययोजना करणे गरजेचे आहे. कित्येकदा वणवा फक्त जंगलातच नाहीतर खाजगी मालमत्तेतही लावला जातो. धनदांडग्यांच्या प्लॉटची साफ सफाई करण्यासाठी सोपा व स्वस्त उपाय म्हणून प्लॉटमधील गवतांना आग लावली जाते. याच आगीमुळे आसपासचा डोंगराळ भाग देखील या आगीच्या विळख्यात येतो. तर याच बरोबर नवीन कुरण येण्यासाठी काही मेंढपाळ, गुर राखणारे गुराखी तर कधी धूम्रपान करणारे महाभाग यांच्याकडून वणवा लावला जातो. वणवा लावणाऱ्यानंवर कठोर कारवाई आवश्यक आहे.
पाचगणी येथील निवासी शाळांचे व्यवस्थापक, हॉटेल व्यवस्थापक, फिल्म मेकर्स, कलाकार वर्ग , शिव सह्याद्री बचाव पथक , सह्याद्री प्रोटेक्टर्स, आय लव्ह पाचगणी समिती सदस्य, रोटरी क्लब सदस्य, एन सी आर टी सदस्य, बांबू कलाकृती निर्मिती संस्था, पॅराग्लायडिंग, जेनीजट्रस्ट , ॲनिमल रेस्क्यू टीम यांच्या माध्यमातून महाबळेश्वर तालुक्यातील विविध भागात वणव्या समस्येवर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. मात्र, सरकारी यंत्रणांमधून उदासीनता पहावयास मिळत आहेत. गावागावांतील शाळांनी देखील निसर्ग वाचविण्याच्या दृष्टीने भाग घेणे आवश्यक आहे.
वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक
वणवा या समस्ये वरती सामाजिक संस्था जनजागृतीद्वारे काम करीत असल्या तरी वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असून वनविभागाने सुद्धा अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने युक्त होऊन काम करणे गरजेचे आहे. यामध्ये ड्रोन कॅमेरा सारख्या उपकरणाचा वापर केल्याने वनरक्षकांना मोठ्या भागावरती नजर ठेवणे देखील सोपे होणार आहे. यासाठी वनविभागाने वनरक्षकांच्या समस्यांवर देखील लक्ष्य द्यायला हवे
-विशाल कानडे, निसर्ग मित्र पाचगणीनिसर्ग व जैवविविधतेची मोठ्या प्रमाणात हानी
वणवा ही समस्या दिवसेंदिवस वाढत असून निसर्गाची व जैवविविधतेची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. वणव्या बाबतीत सर्वच स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहेत तर वनविभागाने आप आपल्या भागातील सामाजिक संस्था यांना एकत्रित घेऊन या समस्या सोडविण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. वृक्षतोड वणवा लावणाऱ्यानं वरती कारवाई होणे गरजेचे आहे
-अमृता पोरे, निसर्गप्रेमी पाचगणीरानमेव्याचा खजिना भस्म करु नका
काही विघ्नसंतोषी लोकांची वणवा लावण्याची वृत्ती या सौंदर्याची राख रांगोळी करते. येणाऱ्या ५ ते १० वर्षात निसर्ग वाचवण्याचे सारे प्रयत्न अपुरे पडणार असून वणवा लावणाऱ्या लोकांना कळकळीची विनंती की आपल्याला प्राणवायू देणारी बेटे आपल्या लहान मुलांना रानमेव्याची मेजवानी देणाऱ्या या रानमेव्याचा खजिना वणव्यात जाळून भस्म करु नका.
-प्रशांत बाळासाहेब डोंगरे, निसर्ग मित्र वाई





