Satara News : भिलारमध्ये बिबट्याचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भिलार परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये (Satara News) भीतीचे वातावरण आहे.

Satara News : भिलार परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये (Satara News) भीतीचे वातावरण आहे. भिलार येथील जननी माता मंदिराजवळ असलेल्या अजीम खान यांच्या बंगल्याबाहेर काल दि. १८ रोजी रात्री सुमारे अकराच्या सुमारास बिबट्या अचानक आल्याची घटना घडली. बंगल्याबाहेर असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्यानेही धाडसाने बिबट्यावर पलटवार केल्याने बिबट्याला तेथून पळ काढावा लागला.
रात्रीच्या शांततेत अचानक बिबट्या मानवी (Satara News) वस्तीजवळ आल्याने परिसरात खळबळ उडाली. अजीम खान यांच्या बंगल्याच्या परिसरात बिबट्याने कुत्र्याला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच कुत्र्याने प्रतिकार केला. कुत्र्याच्या जोरदार पलटवारामुळे बिबट्या काही क्षणातच तेथून निघून गेला. त्यामुळे कुत्र्याचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे.
भिलार परिसर हा डोंगराळ आणि जंगलालगतचा भाग असल्याने येथे वन्यप्राण्यांचा वावर अधूनमधून नागरिकांच्या निदर्शनास येतो. मात्र, बिबट्या थेट घरांच्या परिसरात आणि मानवी वस्तीच्या जवळ येत असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
जननी माता मंदिर परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. रात्रीच्या वेळी पाळीव प्राणी घराबाहेर ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या पाळीव प्राण्यांची सुरक्षित व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या घटनेची वन विभागाने गांभीर्याने दखल घेऊन (Satara News) भिलार परिसरात पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बिबट्याच्या हालचाली नेमक्या कोणत्या भागात आहेत, याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. गरज भासल्यास परिसरात कॅमेरा ट्रॅप बसवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
भिलार परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या वावराच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये कायम सावधतेचे वातावरण असते. आता जननी माता मंदिराजवळच बिबट्या आल्याने नागरिकांच्या भीतीत आणखी भर पडली आहे. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे, घरांच्या परिसरात पुरेसा प्रकाश ठेवावा आणि पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे. बिबट्याचा मानवी वस्तीजवळील वावर लक्षात घेता वनविभागाने तातडीने पाहणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भिलार ग्रामस्थांकडून होत आहे.






