सातारा : आदर्की फाटा येथे चाकूहल्ल्यात बार मालक जखमी

वाठार स्टेशन : -दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मद्यपी ग्राहकास बारमालकाने मारहाण केल्याने चिडून जाऊन संबंधित युवकाने चावीच्या की चेनला असलेल्या चाकूने बार मालकाच्या पोटाच्या डाव्या बाजूला वार केल्याची घटना घडली.
घटनास्थळावरून व वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदर्की फाटा येथील नंदनवन बारमध्ये काल दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान अभिषेक विकास कदम (रा. देऊर ता. कोरेगाव) व त्याचा मित्र अभिमन्यू विकास भोईटे (रा. तडवळे संमत वाघोली) हे बारमध्ये मद्यपान करत असताना धिंगाणा घालत होते. यावेळी वेटरने या दोघांस शांत राहण्यासाठी सांगितले. त्यावेळी अभिषेक कदम याने वेटरला शिवीगाळ केली.
बार मालक विक्रम दत्तात्रय भोईटे याने अभिषेक कदम यास मारहाण केली. त्यावेळी अभिमन्यू भोईटे याने बारमधील काचा फोडल्या. दरम्यान, अभिषेक कदम याने गाडीच्या चावीच्या किचेनमधील चाकूने बार मालक विक्रम याच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार केला. जखमी विक्रम यास प्रथमोपचार करण्यासाठी वाठार स्टेशन येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरता सातारा येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यानच्या काळात चाकू हल्ला करणाऱ्या कदम यास उपस्थित जमावाने बेदम मारहाण केली. यात कदम बेशुद्ध पडल्याने त्याला उपचार करता सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची फिर्याद सिद्धार्थ निळकंठ जेठीथोर याने वाठार पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस नाईक आडके तपास करीत आहेत.





