सातारा – एसटी नाही म्हणून त्याने चालत धऱली घराची वाट

प्रशांत जाधव
सातारा – जगात मोठी लोकशाही असलेल्या देशात आंदोलनाचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असल्याने आजवर आपण अनेक आंदोलने, उपोषणे पाहिली असतील. त्यातील काही सामाजिक तर काही वैयक्तिक अडचणींसाठी केलेली. परंतु, वाई तालुक्यातील निकमवाडी गावचे मुंबईस्थित तरूण उद्योजक जयवंत निकम यांनी एसटी बसेस वेळेत येत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची व नागरिकांची होत असलेली ससेहोलपट पाहून आज (दि.11) एसटी महामंडळाच्या सातार्यातील अधिकार्यांना याबाबत जाब विचारला. मात्र, पदरी निराशा पडल्यामुळे संतापलेल्या निकम यांनी थेट घराची वाट धरून चालत प्रवासाला सुरूवात केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, निकमवाडीचे रहिवाशी असलेले निकम मुंबईला व्यवसाय करतात. तरीही गाव, भाग आणि येथील लोकांसोबतची त्यांची नाळ तुटलेली नाही. त्यामुळे नेहमीच ते भागातील लोकांच्या समस्या घेऊन आवाज उठवत आले आहेत. अनेकदा पदरमोड करून त्यांनी सामाजिक कामे केली आहेत. सोशल माध्यमांवरून देखील निकम व्यवस्थेला जाब विचारत आले आहेत.
मात्र, आज यापैकी काहीच न करता निकम यांनी सातारा येथील एसटीच्या मुख्य कार्यालयात जाऊन ग्रामीण भागात जाणार्या तसेच सातारा ते मुंबई जाणार्या बसेस वेळेत येत नसल्याबाबत अधिकार्यांना जाब विचारला. अधिकार्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने एसटी प्रशासनाचा निषेध म्हणून त्यांनी सातारा ते निकमवाडी हा प्रवास चालत जाण्याचा निर्धार केला. त्यांनी चालत थेट निकमवाडीची वाट धरली. सुमारे 25 किलोमीटर पायी चालत जाण्याच्या निकम यांच्या आंदोलनाचे नागरिक कौतुक करत आहेत. अनेकांनी एसटी प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला.
सातारा आगाराला शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात बसेस दिल्या जात नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागात व मुंबईकडे जाणार्या अनेक फेर्या बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने मी आज सातारा ते निकमवाडी हा 25 किलोमीटरचा प्रवास चालत निघालो आहे. त्यानंतर सातारा ते मुंबई हा प्रवास देखील मी चालत जाणार आहे.
– जयवंत निकम





