सातारा व कराड तालुक्यांमध्ये सर्वाधिक करोना बळी

संतोष पवार
सातारा – जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 28 हजारांच्यावर गेली असून कराड तालुक्यात सात हजारच्यावर तर सातारा तालुक्यात सहा हजारच्यावर बाधितांची संख्या पोहचली आहे. कराड तालुक्यात 142 तर सातारा तालुक्यात 234 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूमध्ये व्याधीग्रस्तांचे प्रमाण अधिक आहे. बाधित आणि मृतांची वाढती संख्या ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असून प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात करोनाचा कहर वाढू लागला आहे. प्रशासनाने युध्दपातळीवर उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न केला. मात्र दिवसेंदिवस वाढणारी बाधित आणि मृत्यूची संख्या निश्चितच चिंताजनक आहे. सध्या तर बाधितांना ऑक्सिजन बेड, ऍम्ब्युलन्स मिळत नसल्याने भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत 73 हजार 522 जणांचे स्वॅबचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 27 हजार 363 बाधित आढळले आहेत. सुमारे 40 हजार 228 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील 16 हजार 585 पुरुष आणि 10 हजार 778 महिला करोनाबाधित आढळून आल्या आहेत. त्यापैकी 16 हजार 524 रुग्ण बरे झाले असून 8 हजार 227 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कराड तालुक्यात सर्वाधिक 7 हजार 127 बाधित असून 142 जणांचा मृत्यू झाला आहे. सातारा तालुक्यात 6 हजार 72 बाधित असून 234 जणांचा मृत्यू झाला आहे. वाई तालुक्यात 2360 बाधित व 76 मृत्यू, कोरेगाव तालुक्यात 2213 बाधित व 63 मृत्यू, फलटण तालुक्यात बाधितांची संख्या दोन हजारच्या वर गेली असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे.
जावळी तालुक्यात 1234 बाधित व 29 मृत्यू, खंडाळा तालुक्यात 1699 बाधित व 26 जणांचा मृत्यू झाला आहे. खटाव तालुक्यात 1543 बाधित व 73 मृत्यू, माण तालुक्यात 877 बाधित व 23 मृत्यू, महाबळेश्वर तालुक्यात 745 बाधित व 10 मृत्यू, पाटण तालुक्यात 1195 करोनाबाधित आले असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याबाहेरील 298 जण बाधित तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात 541 वृध्दांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात गुरुवारपर्यंत शुक्रवारपर्यंत 28 हजार 153 बाधित असून 807 जणांचा मृत्यू झाला आहे. 60 वर्षावरील 541 जणांचा यामध्ये समावेश आहे. 0 ते 9 वयोगटातील 1910 बाधित असून एकाचाही मृत्यू झालेला नाही. 10 ते 19 वययोगटातील 2257 बाधित असून एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
20 ते 29 वयोगटातील 4523 बाधित असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. 30 ते 39 वयोगटातील 4772 जण बाधित असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. 40 ते 49 वयोगटातील 4698 जण बाधित असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. 50 ते 59 वयोगटातील 4082 जण बाधित आले असून 150 जणांचा मृत्यू झाला आहे. 60 ते 69 वयोगटातील 3071 जण बाधित आले असून 217 जणांचा मृत्यू झाला आहे. 70 ते 79 वयोगटातील 1565 जण बाधित आले असून 223 जणांचा मृत्यू झाला आहे. 80 ते 89 वयोगटातील 435 जण बाधत आले असून 89 जणांचा मृत्यू झाला आहे. 90 वर्षावरील 50 जण बाधित आले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे.





