Satara : प्रशासनाकडून 100 दिवसांचा कृती आराखडा जाहीर

मेढा : शासनाच्या सात कलमी कार्यक्रमातील ‘सुकर जीवनमान’ या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्यामध्ये ‘सुकर जीवनमान’ अंतर्गत शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावरील एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंदी कमी करणे, मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी करणे, लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत पतीच्या खात्यावर समाईकात पत्नीचे नाव दाखल करणे, आदी कामकाज करण्याबाबत सातारा जिल्हाधिकार्यांनी निर्देश दिले आहेत. या कृती आराखड्यात जावळी तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होऊन, आपल्या नोंदी करून घ्याव्यात, असे आवाहन तहसीलदार हनमंतराव कोळेकर यांनी केले आहे.
एकत्र कुटुंब मॅनेजर ही संज्ञा कमी करण्यासाठी एकत्र कुटुंब मॅनेजरंनी अर्ज करायचे आहेत. अर्जांसोबत एकत्र कुटुंब मॅनेजर दाखल झाल्याबाबतचा फेरफार, जमिनींचे साताबारा उतारे आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
वारस नोंदींसाठी अर्जासोबत वारसाबाबतचे प्रतिज्ञापत्र, मयत खातेदाराचा मृत्यूचा दाखला, शेतजमिनीचा सातबारा व खाते उतारा, लक्ष्मीमुक्ती योजनेंतर्गत पत्नीचे नाव सातबारा उतार्यावर दाखल करण्यासाठी उतार्यावर नाव दाखल असलेल्या खातेदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, सातबारा आणि खाते उतारा आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. याबाबत जावळी तालुक्यातील नागरिकांनी संबंधित गावांच्या ग्राममहसूल अधिकार्यांकडे (तलाठी) अर्ज करावेत, असे आवाहन कोळेकर यांनी केले आहे.
शासनाच्या अभिनव सात कलमी लोकोपयोगी मोफत कार्यक्रमातून अनेकांचे महसूलबाबतचे प्रश्न वेळेत मार्गी लागतील.
– हणमंतराव कोळेकर, तहसीलदार, जावळी.





