Satara : उपस्थितीची कार्यवाही न झाल्यास कारवाई

सातारा : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये आरोग्य अधिकारी, कर्मचारी वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी यूबीआय अटेंडन्सची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याबाबतची कार्यवाही न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी प्रशासनाला दिल्या. दरम्यान, जिल्हा परिषद ठराव समिती सभेत विविध विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. सर्व विभागांनी पंधरा दिवसांचा कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याची गरज असून सर्वांनी कारभारात गतीमानता आणावी, अशा सूचना नागराजन यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ठराव समितीची सभा झाली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, रोहिणी ढवळे, प्रज्ञा माने- भोसले, जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, अमर नलवडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार आदी उपस्थित होते. सुमारे अडीच तास चाललेल्या ठराव समिती सभेत याशनी नागराजन यांनी विविध विभागांचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.
शंभर दिवसांच्या आराखड्यामध्ये सर्व विभागांनी चांगले काम केले आहे. आता पंधरा दिवसांच्या आराखड्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये त्याच जोमाने काम व्हावे. सर्व विभागांनी कारभारात पारदर्शकता व गतीमानता आणण्याची गरज आहे. बांधकाम विभागांतर्गत रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ऑनलाइन करावी. त्याचप्रमाणे टेस्ट रिपोर्ट असल्याशिवाय कामांची बिले अदा करु नयेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या सभेत विषय पत्रिकेवरील १० आणि ऐनवेळच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मार्चअखेर विभागवार खर्च झालेल्या निधीचा नागराजन यांनी आढावा घेतला. नीलेश घुले यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले.
योजनांबाबत जिल्हा मागे राहू नये
पुण्यातील यशदा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांची दोन दिवसीय कॉन्फरन्स झाली. यामध्ये देण्यात आलल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व खातेप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना याशनी नागराजन यांनी दिल्या. केंद्र व राज्य शासनाचा योजना राबवताना आपला जिल्हा कुठेही मागे राहू नये, यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करा, अशा सुचनाही त्यांनी दिल्या.





