सातारा -विस्कळीत पाणीपुरवठ्याची चौकशी करुम कारवाई करावी

सातारा – शहरातील जीवन प्राधिकरणाद्वारे होणारा पाणीपुरवठा अचानक दि. १७ ऑक्टोंबरपासून ते आजअखेर बंद राहिल्यामुळे यासंदर्भात चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी शहर सुधार शहर परिसर समितीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
शहरातील नागरिकांना पाणी सेवा मिळणे हे घटनात्मक अधिकारात येते. मानवी हक्क कायदा १९९३ च्या राईट टू फूड ॲण्ड राईट टू वॉटर या अधिकाराचे पालन शासन यंत्रणेने करून नागरिकांचे जीवित हक्क अबाधित ठेवण्याची जबाबदारी यंत्रणेवर आहे.
तरी शहरातील व शहर परिसरातील दोन लाख नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. हजारो नागरिक पाण्यासाठी पायपीट करत आहेत. यासाठी विकत घेऊन पाणी मिळवत आहेत. सर्व नागरिकांचा हा आक्रोश असून यंत्रणा काही कारवाई न करता दुर्लक्ष करत आहेत. जीवन प्राधिकरण तांत्रिक कारण सांगून नागरिकांचे हाल करत आहे. शहर सुधार समितीच्यावतीने संघटनेचे पदाधिकारी अस्लम तडसरकार, विक्रांत पवार जलशुध्दीकरण केंद्रात पाहणीस गेले असता तेथे जीवन प्राधिकरणाचे कंत्राटी अधिकारी उपस्थित होते, जबाबदार अभियंता, अधिकारी वर्ग प्रत्यक्ष भेटले नाहीत.
फोनवरून संपर्क केला असता पाणीपुरवठा बंद असण्याविषयी कोणतीही जबाबदारी घेतली नाही. जीवन प्राधिकरण व एमएसईबी यांच्या कारभारातील तांत्रिक व व्यवस्थापन दोष निश्चित करून हा प्रकार मानवी हक्कविषयी संवेदनशील असल्याने व माणसाच्या जीवनाशी संबंधित असल्याने त्याची गुन्हेगारी स्वरुपाची चौकशी होऊन जबाबदारी निश्चित करून गुन्हे दाखल व्हावेत. येथून पुढे विनाविलंब अखंड पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अस्लम तडसरकर, विक्रांत पवार, विजय निकम, शिवाजी राऊत यांच्या सह्या आहेत.





