Satara : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे कारावासाची शिक्षा

खंडाळा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सुरज महादेव चव्हाण (वय 26, रा. शिरवळ, ता. खंडाळा) याला वाई सत्र न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षे कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्याची हकीकत अशी, पीडित अल्पवयीन मुलीला भाकरी करून देण्यासाठी घरी बोलवून जबरदस्ती अत्याचार केल्याची घटना दि. 29-9-2019 रोजी घडली होती. यानंतर पीडीतेला जिवे मारण्याची धमकी देऊन दोन ते तीन वेळा अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शिरवळ पोलीस स्टेशन येथे सुरज महादेव चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेच्या तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी वाईचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर.एन. मेहेरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता एम. यू. शिंदे यांनी कामकाज पाहिले. यामध्ये एकूण नऊ साक्षीदार तपासले तसेच परिस्थितीजन्य पुरावा व साथीदारांच्या साक्षीवरून न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी आरोपी सुरज चव्हाण याला दोषी ठरवत वीस वर्षाची कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
याकामी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एम यु शिंदे, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, शिरवळचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल डी. एस. टिळेकर यांनी परिश्रम घेतले. पोलीस अंमलदार काळे, कीर्तीकुमार कदम, घोरपडे, कदम, शिंदे, कुंभार, बांदल यांनी मदत केली.





