Satara : निधी खर्च न झाल्यास खातेप्रमुख जबाबदार

सातारा : जिल्हा नियोजन समितीसह विविध माध्यमांतून मंजूर असलेला निधी मार्चअखेर खर्च होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी नियोजन करावे. मार्चअखेर निधी खर्च करण्याची जबाबदारी खातेप्रमुखांची असणार आहे. गावोगावी होत असलेली विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी अधिकाऱ्यांनी क्षेत्र भेटी देऊन कामाची पाहणी करावी, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी ठराव समिती सभेत दिल्या.
जिल्हा परिषदेच्या ठराव समितीची सभा स्थायी समिती सभागृहात याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, अर्चना वाघमळे, रोहिणी ढवळे, प्रज्ञा माने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, अमर नलवडे, संजय लाड, कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार आदी उपस्थित होते.
या सभेत विषयपत्रिकेवरील ११ आणि ऐनवेळच्या विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली. यावेळी याशनी नागराजन यांनी प्रत्येक विभागाचा आढावाही घेतला. अनेक विकास कामांना प्रशासकीय मंजुऱी देण्यात आली असून ही कामे लवकरात लवकर सुरू करावीत. ३१ मार्चपर्यंत जास्तीत जास्त निधी खर्च होण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्वच विभागांनी विविध योजनांवर आलेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी नियोजन करावे.
शंभर दिवसांच्या आराखड्यातील कामे मुदतीत पूर्ण होण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी लक्ष केंद्रीत करावे. प्रशासकीय शिस्त राहावी यासाठी विभागप्रमुखांनी विशेष लक्ष देण्याची सूचना नागराजन यांनी केली. नीलेश घुले यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले.





