Satara News : उज्जैनला निघालेल्या भाविकांचा साताऱ्यात भीषण अपघात; 3 जण ठार

सातारा : साताऱ्यामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये उज्जैनला देव दर्शनासाठी निघालेल्या भक्तांवर काळाने घाला घातला आहे. या भाविकांनी भरलेली मिनी बस आणि ट्रक यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.
कसा घडला अपघात?
सातारा जिल्ह्यात लोणंद-सातारा रस्त्यावर सालपे गावाजवळ रात्रीच्या सुमारास मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. इचलकरंजीहून उज्जैन देवदर्शनासाठी निघालेली मिनी ट्रॅव्हल्स आणि लोणंदहून साताऱ्याकडे येणारा ट्रक यांच्यात हा अपघात झाला. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स चालक सलमान सय्यद, एक महिला रजनी दुर्गुळे यांचा जाग्यावर मृत्यू झाला. तर अन्य एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच सालपे ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली. जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून लोणंद पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. या अपघातामध्ये मिनी बस आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सांगलीमध्येदेखील भीषण अपघात
सांगलीच्या मिरज या ठिकाणी रेल्वेपुलावर दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता,की यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातामुळे काही वेळ- सांगली-मिरज मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.





