Satara : माणमध्ये राष्ट्रवादीला अभयसिंह जगताप उभारी देतील

दहिवडी : लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला माण-खटावमध्ये काहीशी मरगळ आली होती. मात्र, अभयसिंह जगताप यांनी सत्तेपुढे नांगी न टाकता, आपले काम धैर्याने सुरू ठेवले आहे. त्यामुळे माण तालुक्यात राष्ट्रवादीला तेच उभारी देतील, असे मत खा. धैर्यशील पाटील व खा. नीलेश लंके यांनी व्यक्त केले. अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या राष्ट्रीय कुस्ती मैदानात ते बोलत होते.
अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा कुस्तीगीर संघांच्या मान्यतेने झालेल्या भव्य कुस्ती स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. खुल्या आणि दहा वजनी गटांमध्ये ही स्पर्धा झाली. विजेत्या मल्लांना बक्षिसे आणि वर्षभर मानधन देण्यात येणार आहे. खुल्या गटात जवळपास 44 मिनिटांच्या रोमहर्षक कुस्तीत पृथ्वीराज पाटील याने दादा शेळकेला गुणांवर पराभूत केले. गणेश कुंकुले विरुद्ध शुभम सिदनाळे ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – वरिष्ठ गट (विजेता व उपविजेता) – 65 किलो – आरु खांडेकर (म्हसवड) व उदयराज गारळे (वडूज), 70 किलो – विशाल रुपनवर (म्हसवड) व विकास पिसाळ (जांभुळणी), 74 किलो – रामचंद्र रुपनवर (म्हसवड) व गौरव भगत (मोही), 79 किलो – राहुल कोरडे (मायणी) व प्रसाद पुकळे (जांभुळणी), 79 किलोवरील – माण-खटाव केसरी विजेता गणेश कुंकुले (पिंपरी) मानाची गदा आणि 31 हजार रुपये रोख, उपविजेता मंगेश माने (रहिमतपूर) करंडक आणि 21 हजार रुपये रोख, तृतीय क्रमांक – राघू ठोंबरे (ठोंबरेवाडी) करंडक आणि 11 हजार रुपये रोख, शिवसंकल्प केसरी – ऋषीकेश झिमल (गंगोती).
विविध मल्लांचा पुरस्कारांनी गौरव
उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांना माणदेश गौरव, ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांना प्रेरणा, सचिन नरळे यांना आदर्श वस्ताद आणि नाथा गेंड यांना क्रीडागौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ऋषीकेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली व आशियाई सुवर्णपदक विजेते एनआयएस प्रशिक्षक अमोल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वी झाली.





