सातारा – तीन रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी 25 कोटी

सातारा – शहरातील रस्ते चकाचक करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून सातत्याने निधी उपलब्ध करून देणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून शहरातील तीन रस्ते कॉंक्रिटीकरण करण्यासाठी तब्ब्ल 25 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार राज्याच्या नगर विकास विभागामार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून हा निधी उपलब्ध झाला आहे. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
शहरातील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी 50 कोटींचा निधी देण्याची मागणी आ. शिवेंद्रसिंहराजेंनी फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याचवेळी फडणवीस यांनी निधी देण्यास सकारात्मकता दर्शवली होती. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार सातारा पालिकेने तसा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे सादर केला होता. त्यांनतर आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पहिल्या टप्प्यातील 25 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने या निधीला मान्यता दिली आहे. या निधीतून सातारा शहरातील तीन रस्ते लवकरच कॉंक्रिटचे केले जाणार आहेत.
शहरातील मध्यवर्ती असेलेले जुना आरटीओ ते सुभाषचंद्र बोस चौक, सदरबझार येथील सुमित्राराजे उद्यान ते कूपर बंगला आणि मोना स्कूल ते लोणंद रोड या तीन रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण मंजूर निधीतून होणार आहे. त्यामुळे तीनही रस्ते चकाचक होणार आहेत. या कामांसाठी पहिल्या टप्प्यात 25 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून उर्वरित 25 कोटी रुपयांचा निधी लवकरच मजूर होईल. त्यातून शहरातील अन्य महत्वाचे रस्तेही कॉंक्रिटचे होतील, असे त्यांनी सांगितले.





