satara | पशुपालकांनी जनावरांची नोंद

सातारा, (प्रतिनिधी) – राज्यातील सर्व जनावरांना ईअर टॅगींग व त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद बंधनकारक असून कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई यांचा दि.२७ फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे.
शासन निर्णयानुसार भारत पशुधन प्रणालीवर पशुपालकांची सर्व माहिती मोबाईल नंबर, आधार नंबर तसेच पशुपालकाकडे असणारी जनावरांची माहिती जनावरांचे वय, लिंग, जात, मिल्कींग स्टेटस् इ. अद्ययावत करणे आवश्यक आहे.
१ जून २०२४ पासून ईअर टॅगींग व भारत पशुधन प्रणालीवरील नोंदी शिवाय जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही. तसेच पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही. केंद्र व राज्य शासनाकडून देय आर्थिक सहाय देय होणार नाही, नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही. राज्यातंर्गत जनावरांची वाहतुक करता येणार नाही. मालकी हस्तांतरण होणार नाही.
वरील सर्व बाबी टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व जनावरांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून ईअर टॅगींग करुन घ्यावे व त्याच्या अचुक नोंदी भारत पशुधन प्रणालीवर तात्काळ करुन घ्याव्यात, असे आवाहन डॉ. दिनक बोर्डे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सातारा यांनी केले आहे.





