सासवड : सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आनंदीकाकी जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विकासकामांबाबत सविस्तर माहिती दिली. पुरंदर तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सासवडचे महत्त्व आगामी काळात अधिक वाढणार असून पुण्याचे उपनगर म्हणून सासवडची ओळख निर्माण होणार आहे, असे त्यांनी सांगितले. स्व. चंदूकाका जगताप यांच्या कार्याचा उल्लेख करताना आनंदीकाकींनी म्हटले की, चंदूकाकांनी सासवडमध्ये स्वच्छ व शिस्तबद्ध वातावरण निर्माण केले. नागरिकांना शिस्त लावण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. तीच शिस्त, तेच मूल्य आणि विकासाचा तोच वेग आम्ही पुढे नेऊ. यापूर्वी मंजूर झालेल्या ड्रेनेज व पिण्याच्या पाईपलाईन प्रकल्पांबाबतही त्यांनी माहिती दिली. नगरपरिषदेस प्रशासक लागल्यानंतर ही महत्त्वाची कामे अर्धवट राहिली असल्याचे त्या म्हणाल्या. राज्यातील मुख्यमंत्र्यांनी या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे. पुरंदर तालुक्यातील आंजिर, डाळिंब व सीताफळ प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रकल्प उभारणीची शक्यता आहे. येथील कृषी उत्पादनांना देश-विदेशात वाढती मागणी असल्याने या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उभ्या राहतील, असेही त्यांनी सांगितले. स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा, ते आपल्याच तालुक्यात स्थिर व्हावेत हे आमचे उद्दिष्ट आहे, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. जनतेचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा करताना आनंदी काकींनी सांगितले, तळागाळातील नागरिकांशी आमचे घट्ट संबंध आहेत. लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, कारण आम्ही लोकहिताचे निर्णय घेतो. विकासाचे काम बोलते, आणि जनमत आमच्या सोबत आहे. निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आनंदी काकी जगताप यांच्या या वक्तव्यामुळे सासवडच्या राजकीय चर्चांना नवीन दिशा मिळाली आहे. सासवडचा चेहरामोहरा बदलण्यात स्व. चंदूकाकांच्या विकासकामांची भूमिका महत्त्वाची राहिली. पुढील काळातही विकासाच्या धारेला वेग दिला जाईल. आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढते औद्योगिक प्रकल्प आणि सुधारित नागरी सुविधा यामुळे सासवड शहराचा सर्वांगीण विकास होणार आहे. -आनंदीकाकी जगताप, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सासवड