प्रभात वृत्तसेवा सासवड – महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर) येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची खानवडी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात जयंती साजरी होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकीक मिळविलेल्या सावित्रींच्या लेकींचा क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सासवड येथील तुकाईमाता मंदिर येथे नियोजन बैठक पार पडली. यावेळी जयंती उत्सवानिमित्त आढावा घेण्यात आला. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मभूमीमुळे पुरंदर तालुका पावन झाला असून सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक क्षेत्रात तालुक्याचा लौकिक वाढलेला आहे. याच पार्श्वभूमीवर (दि.३) जानेवारी २०२६ रोजी सावित्रीमाई फुले यांची १९५ वी जयंती खानवडी येथे भव्यतेने साजरी करण्याच्या दृष्टीनेबैठकीत नवनाथ होले यांनी प्रास्ताविकात जयंती उत्सवाचा सविस्तर आढावा घेतला. खानवडी येथे सुरू असलेल्या तयारीचा व विविध उपक्रमांचा वृत्तांत सभेपुढे मांडला. कार्यक्रम अधिक प्रभावी, वैचारिक व लोकप्रबोधनात्मक व्हावा यासाठी उपस्थित मान्यवरांनी मते व सूचना मांडल्या. यावेळी जयंती सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील, निंबकर ॲग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर पद्मश्री डॉ. अनिल राजवंशी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, फियट कपनीच्या प्रमुख संचिता कुमार उपस्थित राहणार आहेत. यावेळी समता प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद म्हेत्रे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवडचे अध्यक्ष ॲड. दिलीप निरगुडे, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता भोंगळे, ॲड. कमलेश म्हेत्रे, इस्कॉनचे वामनराव भोंगळे, विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष बाळासासेब राऊत, ॲड. बापूसाहेब गायकवाड, संजय चौखंडे, गौरव चौरे, तुकाराम गिरमे, चंद्रकांत गिरमे, अशोक भोंगळे, अरविंद क्षीरसागर, अण्णा टिळेकर, बाळासाहेब शेवते, बाळासाहेब गेनबा बोरावके, मारुती पिलाने, संजय शेवते, सुरेश टिळेकर आदी उपस्थित होते. सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा जागर, स्त्री-शिक्षणाचे महत्त्व व सामाजिक समतेचा संदेश घराघरात पोहोचवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. (दि.3) जानेवारी रोजी खानवडी ग्रामस्थांच्या वतीने ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. सातासमुद्रापार पोहोचलेल्या लेकींची संघर्ष गाथा सातही खंडावर स्कायड्रायव्हिंग करणारी प्रथम महिला पद्मश्री शीतल महाजन, वास्तु विशारद, उद्योजिका प्रतिमा जोशी, आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक सुरेखा यादव, विशेष पोलीस महानिरीक्षक, शारदा राऊत, आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती प्रशिक्षक व कुस्ती मधील पीएचडी करणारी पहिली भारतीय महिला डॉ. शबनम शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.