प्रभात वृत्तसेवा सासवड – सासवड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुरंदर- हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भव्य जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. स्वच्छतेत देशात अग्रस्थान मिळवलेल्या सासवडला आता विकासातही सर्वोच्च स्थान मिळवून देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. जगताप यांनी जाहीरनाम्यात म्हटले आहे की, सासवड शहराने स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक मिळवला असून यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान प्राप्त झाला आहे. या यशानंतर आता शहराचा सर्वांगीण आणि आधुनिक विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रकल्प राबवले जाणार आहेत. सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, दरडोही 70 लिटर पाणीपुरवठा होत असला तरी नवीन विहीर योजनेमुळे हा पुरवठा दरडोही 135 लिटरपर्यंत वाढणार आहे. 5.8 एमएलडी इतका पाणीपुरवठा सध्या शहराला केला जात असून 60 किमीपर्यंत विस्तारित वितरण व्यवस्था, 46.8 लाख लिटर साठवण क्षमता आणि 8 एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र कार्यरत आहे. सोपाननगर, आंबेडकर उद्यान, सरकारी दवाखाना, साठेनगर अशा भागांमध्ये प्रत्येकी पाच ते दहा लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत.वीर धरणातून नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी 19 जानेवारी 2022 पासून विविध प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पार पडल्याचे जाहीरनाम्यात नमूद केले आहे. निसर्ग कन्सल्टन्सीची निवड, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत प्रस्ताव, कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे सादर केलेले आराखडे, 5 डिसेंबर 2024 रोजी मिळालेली प्रशासकीय मान्यता यांचा तपशीलही अहवालात दिला.महाप्रकल्पातील प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 18 एमएलडी क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र, 5 नवीन ईएसआर पाण्याच्या टाक्या, 113 किमी. वितरण जाळे, 150 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प, वीर धरणावर नवीन जॅकवेल आणि कांबळवाडी येथे बूस्टर पंप हाऊस उभारणीचा समावेश आहे. विकासातही देशात पहिला आणणार भुयारी गटार योजना, घराघरांत पाइपद्वारे गॅस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स, UPSC–MPSC स्पर्धा परीक्षा केंद्र, रणगाडा स्मारक, कोविडकाळात जनसेवेच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मदत, अशा अनेक उपक्रमांची माहिती या जाहीरनाम्यात दिली आहे. स्वच्छतेत प्रथम स्थान मिळवलेल्या सासवडला आता विकासातही देशात पहिला क्रमांक मिळवून देणे हे नगरपालिकेचे ध्येय आहे, असे संजय जगताप यांनी जाहीरनाम्यातून सांगितले आहे.