प्रभात वत्तसेवा सासवड – वीर (ता. पुरंदर) येथे सौरभ वाघ या युवकास बेदम मारहाण करून गावात धिंड काढल्याच्या प्रकरणात नव्या घडामोडी घडल्या. याप्रकरणी सासवड पोलिसांनी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष संतोष धुमाळ यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.सौरभ वाघ याच्या फिर्यादीनुसार, एका स्थानिक हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादातून त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याची इंदिरानगरपासून उमाजी नाईक चौकापर्यंत धिंड काढण्यात आली. सुरुवातीला दबावामुळे केवळ काही निवडक आरोपींचीच नावे त्याने दिली होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेज व सामाजिक पाठिंब्यावर आधारित पुरवणी जबाबात त्याने उर्वरित आरोपींची नावे सासवड पोलिस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी संतोष धुमाळ, ऋषिकेश बाळासाहेब धुमाळ, अजित विठ्ठल चव्हाण, रूपेश रतन धुमाळ, गणेश बाबूराव धुमाळ, मंगेश महादेव धुमाळ, गणेश विद्याधर धुमाळ, रोहन संजय धुमाळ, योगेश चंद्रकांत धुमाळ आणि इतर १० अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.