प्रभात वृत्तसेवा सासवड – सासवड शहरात रविवारी रात्री चोरट्यांनी एकाच रात्री सलग पाच दुकानांमध्ये घरफोडी करून सुमारे ३ लाख ३६ हजार ५०० किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी ओंकार युवराज निगडे (वय २७, रा. शिक्षक सोसायटी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २ नोव्हेंबरच्या रात्री ९.३० ते ३ नोव्हेंबर सकाळी ६.०० या दरम्यान घडली. चोरट्यांनी सासवड येथील ‘शूज आर्ट’ या बूटांच्या दुकानासह, किसन मगर यांचे ‘मगर बेकरी’, मंगेश काकडे यांचे ‘एम.के. मोबाईल शॉपी’, किरण जगताप यांचे ‘रामदेव फॅशन’ आणि महेश भिंताडे यांचे ‘हॅलो मोबाईल शॉपी’ या दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, टॅबलेट, चप्पल व शूजचा साठा, तसेच रोकड रक्कम असा एकूण ३.३६ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. त्यात अनेक कंपन्यांचे मोबाइल, रोकड रक्कम होती. फक्त मोबाइल शॉपमधूनच दीड लाखांचा माल चोरीस गेला आहे, बेकरी आणि कपड्यांच्या दुकानातूनही रोकड उडवली आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू असून रात्री उशिरा शहराच्या उपनगरांमध्ये संशयितांची हालचाल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.