सासवड- करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी दौंड-पुरंदर यांच्या आदेशान्वये सासवड शहर शनिवार व रविवारी आठवड्यातून दोन दिवस बंद राहणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीतपणे सुरू राहतील, अशी महिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद जळक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. सासवड शहर सोमवार ते शुक्रवार पाच दिवस सुरळीतपणे सुरु ठेवण्यात येणार आहे. तर शनिवारी व रविवारी दवाखाने, मेडिकल, टेस्टिंग लॅब हे पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. दूध संकलन व विक्री सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने शनिवारी व रविवारी फिरत्या स्वरूपाचा राखी व्यवसाय सुरू राहणार आहे. बंद काळात नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.