Pune: ससून ड्रग्ज प्रकरणी सुभाष मंडल आणि रौफ शेखच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे – ससून ड्रग्ज प्रकरणातील दोघांच्या पोलीस कोठडीत 9 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्याचा आदेश सत्र न्यायाधीश जे.जी.डोरले यांनी दिला आहे. सुभाष जानकी मंडल (वय 29, रा. देहुरोड, मूळ झारखंड) आणि रौफ रहिम शेख (वय 19, रा. ताडीवाला रस्ता) अशी पोलीस कोठ्डी झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघांना 1 ओक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे.
पोलीस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी अतिरिक्त सरकारी वकील नितिन कोंघे यांनी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. बचाव पक्षातर्फे ऍड. शिवप्रसाद साळुंके यांनी काम पाहिले.
ऍड. कोंघे म्हणाले की, गुरूवारी (दि.5) संध्याकाळी ससून रुग्णालय वॉर्ड क्रमांक 71 आणि 74 आणि येरवडा जेल बंदी वॉर्ड क्रमांक 16 आणि बालविकास कॅंटीनमधील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. आरोपीचे समक्ष हे पाहण्यात येत आहे. त्यात दोन्ही आरोपी दिसून येत आहेत. यातून मुख्य आरोपी ललित अनिल पाटील याला अमली पदार्थ कोणी पुरविला निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे.
ललित याने या दोघांच्या मार्फत आणखी कोणाला अमली पदार्थ विकला आहे का, अन्य कोठे साठा करून ठेवला आहे का, नाशिक येथील आणखी दोघांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला आहे.
ललित आणि त्या दोघांचा शोध सुरू आहे. त्यासाठी पथके रवाना झाली आहेत. गुन्ह्यात मंडल याच्याकडून तब्बल 1 किलो 71 ग्रॅम 53 मिलिग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. जप्त माल व्यापारी प्रमाणात आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी ऍड. कोंघे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा आदेश दिला.





