बंगलुरू – अद्रमुकच्या माजी नेत्या शशिकला यांची आज येथील रूग्णालयातून मुक्तता करण्यात आली होती. त्यांची नुकतीच चार वर्षांच्या कारावासातून सुटका करण्यात आली आहे. पण त्यांना कारागृहात असतानाच करोनाची बाधा झाल्याने कारागृह अधिकाऱ्यांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले होते.
त्यामुळे त्यांची कारागृहातून सुटका होऊनही त्यांना रूग्णालयातच राहावे लागले होते. गेले काही दिवस त्यांचे चाहते आणि समर्थक त्या बाहेर येण्याच आतुरतेने वाट पहात होते. आज त्या व्हिलचेअरवरून रूग्णालयाच्या बाहेर आल्यावर आणि त्यांचे दर्शन झाल्यावर त्यांच्या तेथे जमलेल्या चाहत्यांनी त्यांचा जोरदार जयजयकार केला.
66 वर्षीय शशिकला यांना आता चेन्नाईत नेले जात आहे असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. शशिकला या तामिळनाडुच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्ती होत्या. त्यांच्यासह शशिकला यांना 66 कोटी रूपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.