Beed News : बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ; ‘या’ 4 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणामुळे बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे. देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कर्तव्यात कुचराई केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला. यानंतर गृहखात्याने बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली.
या बदलीनंतरही सातत्याने गावकऱ्यांकडून पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील एक ट्वीट करत बीड पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एसआयटीमध्ये असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.
4 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
यानंतर बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ करण्यात आली आहे. बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. ते केज पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं.
पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. पोलीस निरीक्षक सय्यद मजहर अली अबू तालीब हे नियंत्रण कक्षातून आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार घेणार आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केज पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे.





