Sarpanch : श्री क्षेत्र वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी पल्लवी प्रदीप शिंदे यांची निवड झाली आहे. त्यांच्या विजयाबद्दल गावात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी सरपंच वैशाली चंद्रकांत केसवड यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पल्लवी शिंदे आणि सविता श्रीकांत गावडे यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत पल्लवी शिंदे यांनी २०५९ मते मिळवून ५९३ मतांच्या फरकाने विजय मिळवला. प्रतिस्पर्धी सविता गावडे यांना १४६६ मते मिळाली. ग्रामपंचायतीतील आजी-माजी पदाधिकारी, तरुण मंडळे आणि महिला प्रतिनिधी यांच्या पाठिंब्यामुळे हा विजय शक्य झाल्याची भावना पल्लवी शिंदे यांनी व्यक्त केली. आगामी काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत ‘दैनिक प्रभात’तर्फे नुकताच त्यांना ‘प्रभात सुपर वुमन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी जल्लोषात मिरवणूक काढत एकमेकांना पेढे भरवून उत्सव साजरा केला. हा विजय सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाचा असल्याची प्रतिक्रिया माजी उपसरपंच संजय भोरडे पाटील यांनी व्यक्त केली.