Sarfaraz Khan : शतक झळकावताच सरफराजच्या वडिलांचे ‘ते’ शब्द ठरले खरे..

बंगळुरू : या वर्षाच्या सुरुवातीला सरफराज खानने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या मुलाने पदार्पण करताच त्याचे वडील नौशाद खान हे कॉमेंट्री बॉक्समध्ये म्हणाले होते की, ‘रात को वक्त दो गुजारने के लिए, सूरज अपने ही समय पर ही निकलेगा’. आज त्यांचे हे शब्द खरे ठरले आहेत. सर्फराझ खानने आज बंगळुरू येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावून भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे.
वडिलांचे ‘ते’ शब्द ठरले खरे
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्यानंतर सरफराज खानला अखेर फेब्रुवारी २०२४ मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. कर्णधार रोहित शर्माने त्याला कॅप दिली तेव्हा सर्फराझचे वडील भावूक झाले होते. त्यानंतर सर्फराझ फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्याच्या वडिलांना कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलावण्यात आले.
हिंदी समालोचक आकाश चोप्राने विचारले की, तुमच्या मुलाला इतक्या उशिरा पदार्पण करण्याची संधी मिळाली हे कसे वाटते? सर्फराझ खानच्या वडिलांनी उत्तर दिले, ‘रात को वक्त दो गुजारने के लिए, सूरज अपने ही समय पर निकलेगा’. अखेर आज मुलाने शतक करून वडिलांचे शब्द खरे करून दाखवले.
आनंद गगनात मावेना
सरफराज खानने पहिले शतक पूर्ण करताच त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने शतकानंतर धावत मैदानाला राऊंड मारला. त्यानंतर क्रीजवर उपस्थित असलेल्या ऋषभ पंतने त्याची गळाभेट घेतली. भारतीय ड्रेसिंग रूममध्येही जल्लोष पाहायला मिळाला.
David Warner's story on Sarfaraz Khan is pure class and love. #davidwarner #warner #INDvsNZ #sarfaraz #SarfarazKhan pic.twitter.com/6uoiu8vQtg
— KOTH Gaming (@KOTHGaming_) October 19, 2024
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने केले सरफराजचे कौतुक
डेव्हिड वॉर्नरने २६ वर्षीय सरफराजच्या शतकी खेळीचे आणि मेहनतीचे कौतुक करत इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. “शाबास सरफराज. तुझ्या एवढ्या मेहनतीनंतर हे शतक पाहून आनंदा झाला.” त्याचवेळी वॉर्नरने शेअर केलेल्या सरफराजच्या फोटोंच्या कोलाजवर हिंदीत लिहिले आहे की, ‘रात को वक्त दो गुजारने के लिए, सूरज अपने ही समय पर निकलेगा’. सध्या ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.





