मुंबई – बॉलिवूडची हॉट अँड बोल्ड अभिनेत्री ‘सनी लिओनी’ नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती तिच्या नुकतेच रिलीज झालेल्या “मधुबन’ या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे संतांनी तसेच, मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या गाण्याच्या व्हिडिओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी केली.
या गाण्याचे बोल “नाचे मधुबन मे राधिका’ असे असल्यामुळे तसेच व्हिडिओमध्ये सनी लिओनीचा बोल्ड डान्स पाहून लोक नाराजी व्यक्त करत आहेत. या गाण्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
त्यामुळे या व्हिडिओत दिसणारी अभिनेत्री सनी लिओनीने गाण्याबद्दल माफी मागावी आणि तीन दिवसात ‘मधुबन’ गाणे मागे घ्यावे, अन्यथा तिच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
View this post on Instagram
दरम्यान, आता या सर्व प्रकरणानंतर सारेगामाने सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी केले असून, माघार घेतल्याचे दिसून येत आहे. म्युझिक लेबलने आपल्या निवेदनात लिहिले आहे की,
“आपल्या देशवासीयांच्या अलीकडील प्रतिक्रिया आणि भावनांचा आदर करून आम्ही ‘मधुबन’ गाण्याचे नाव आणि बोल बदलू. येत्या 3 दिवसात सर्व प्लॅटफॉर्मवर जुन्या गाण्याऐवजी नवीन गाणे सादर केले जाईल.’ या आशयाची पोस्ट सारेगामाने केली आहे.
सनी लिओनीवर चित्रित करण्यात आलेलं ‘मधुबन’ हे गाणं मोहम्मद रफी यांच्या 1960 मध्ये आलेल्या ‘कोहिनूर’ चित्रपटातील ‘मधुबन में राधिका नाचे..’ या गाण्यावर आधारित आहे.