Pune District : सरडेवाडी टोल नाका तरुणांकडून बंद
Pune District : रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणाबाबत निवेदन देण्यासाठी पळसदेव येथील काही ग्रामस्थ सरडेवाडी टोल नाक्यावर गेले होते. मात्र, तेथे जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

पळसदेव : पुणे-सोलापूर महामार्गावर सरडेवाडी परिसरात रस्ता उखडून ठेवल्याने दुचाकीस्वारांच्या अपघातांची मालिका सुरूच आहे. आतापर्यंत सुमारे 15 ते 20 जण जखमी झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना आणि सूचना फलक नसल्याने प्रवाशांना धोका निर्माण झाल्याचा आरोप करत पळसदेव परिसरातील संतप्त तरुणांनी गुरुवारी सरडेवाडी येथील टोल नाका काही काळ बंद ठेवत प्रशासनाचा निषेध केला.
इंदापूर तालुक्यासह लातूर, धाराशिव, सोलापूर, तुळजापूर आणि हैदराबादकडे जाणार्या प्रवाशांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. रस्ता उखडून ठेवण्यात आल्याने काम सुरू असल्याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामध्ये हात-पाय मोडण्यासह गंभीर दुखापती झाल्याचा दावाही करण्यात आला.
रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणाबाबत निवेदन देण्यासाठी पळसदेव येथील काही ग्रामस्थ सरडेवाडी टोल नाक्यावर गेले होते. मात्र, तेथे जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. उपस्थित कर्मचार्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. रस्त्यावरील अपघातांची परिस्थिती गंभीर असताना संबंधित यंत्रणा गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना घटनास्थळी बोलावण्याची मागणी केली. यावेळी संतप्त तरुणांनी टोल नाका काही काळ रोखून धरला.
गेल्या काही दिवसांपासून संबंधित ठेकेदाराकडून महामार्गाचा रस्ता उखडून ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी डांबराचे अस्तरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी पावसाळ्यात सुरू असलेल्या या कामामुळे प्रवाशांचा त्रास वाढला आहे. रस्त्याचे काम करताना सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. कुंभारगाव, कळस, पळसदेव, निमगाव केतकी, काळेवाडी आणि डाळज परिसरातील अनेक दुचाकीस्वार उखडलेल्या रस्त्यावर घसरून पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी सुरक्षा साधने, सूचना फलक किंवा पुरेशी खबरदारी घेण्यात आली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
दिलेल्या मुदतीत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अॅड. मयूर शिंदे, तालुकाध्यक्ष विवेक काळे, महेंद्र काळे, प्रदीप काळे यांच्यासह उपस्थित शेकडो तरुण व ग्रामस्थांनी दिला. टोल कंपनीच्या देखभाल-दुरुस्ती विभागाचे अभियंता अमर सपाटे यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांना रस्त्याचे काम उद्यापर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्यांना ठेकेदारामार्फत वैद्यकीय मदत देण्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अपघातांची मालिका सुरूच
रस्ता उखडून ठेवल्यापासून आतापर्यंत सुमारे 15 हून अधिक नागरिक जखमी झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. अपघात होऊनही रस्त्याची स्थिती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तत्काळ सुधारणा करण्यात न आल्याने परिसरातील तरुणांमध्ये संताप निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर तरुणांनी थेट सरडेवाडी टोल नाक्यावर आंदोलन केले. आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. अखेर टोल कंपनीकडून रस्त्याचे काम उद्यापर्यंत पूर्ण करण्याचे तसेच अपघातात जखमी झालेल्यांना वैद्यकीय खर्चासाठी मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
सरडेवाडी (ता. इंदापूर) :पुणे-सोलापूर महामार्गाच्या कामातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी सरडेवाडी टोल नाका काही काळ बंद ठेवला.





