हिंगोलीत सरस्वती नदीला पूर; बरडा येथील महादेव मंदिरात अडकलेले पुजारी व दोन भाविकांची सुखरूप सुटका

हिंगोली – हिंगोली जिल्ह्यात सोमवारी, दि. 21 जुलै रोजी रात्रीपासून बरडा-पिंपरी परिसरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. यामुळे सेनगाव तालुक्यातील बरडा शिवारातील सरस्वती नदीला प्रचंड पूर आला आणि महादेव मंदिरात पुराचे पाणी शिरले. यामुळे मंदिरात अडकलेले पुजारी शिवेंद्र महाराज आणि दोन भाविक, सुभाष सानप व काकड महाराज, यांना आज सकाळी 9 वाजता सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर सोमवारी रात्रीपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. यामुळे नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून, पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, जालना जिल्ह्यातील मंठा आणि बुलडाणा जिल्ह्यातील लोणार परिसरातील मुसळधार पावसामुळे सरस्वती नदीला पूर आला. बरडा शिवारातील महादेव मंदिरात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी शिरले, ज्यामुळे मंदिरात मुक्कामाला असलेले पुजारी आणि दोन भाविक अडकले. त्यांनी मंदिराच्या छतावर आश्रय घेऊन गावकऱ्यांशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना तातडीने कळवले. त्यानंतर सकाळी तहसीलदार सखाराम मांडवगडे आणि सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मस्के यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले.
गावकरी प्रल्हाद योगेश वऱ्हाड, परमेश्वर सानप, उध्दवराव सानप, एकनाथ सानप, संतोष वऱ्हाड यांच्यासह अन्य ग्रामस्थांनीही बचावकार्यात सहभाग घेतला. नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासन आणि गावकऱ्यांच्या समन्वयाने केलेल्या तत्परतेमुळे ही सुटका यशस्वी झाली.





