Saptashrungi Temple : 24 तास सुरू राहणार सप्तशृंगीचं दर्शन; मात्र ‘या’ वाहनांना असणार बंदी

नाशिक: आज, 22 सप्टेंबर 2025 पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात या काळात 24 तास दर्शनाची व्यवस्था आहे. यंदा नवरात्रीत सुमारे 15 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. आज सकाळी 7 वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते पंचामृत महापूजा संपन्न झाली, तर 9:30 वाजता मंदिरात घटस्थापना करण्यात आली.
धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन
23 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत दररोज सकाळी 7 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते पंचामृत महापूजा होईल. 30 सप्टेंबर रोजी अष्टमीला सकाळी 7 वाजता पालखी पूजन आणि नगरप्रदक्षिणा होईल. 1 ऑक्टोबर रोजी नवमीला शतचंडी याग, होमहवन पूजा होईल, तसेच दुपारी 3 वाजता दरेगावचे पारंपारिक मानकरी गवळी पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि सप्तशृंगी गावात कीर्ती ध्वजाची मिरवणूक निघेल. त्याच रात्री 12 वाजता गडाच्या शिखरावर ध्वजारोहण होईल.
दसऱ्याच्या दिवशी, 2 ऑक्टोबरला शतचंडी यागाची पूर्णाहुती आणि महापूजा होईल. 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त पंचामृत महापूजा, कावडी धारकांनी आणलेल्या तीर्थांचा महाभिषेक आणि रात्री 9 ते 12 दरम्यान देवीची आरती होईल. 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी गडावर शांतीपाठ आणि महाप्रसादाचे आयोजन देवस्थानतर्फे केले जाईल.
‘या’ वाहनांना असणार गडावर बंदी
22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत सप्तशृंगीगड ते नांदुरी घाट रस्ता खासगी वाहनांसाठी बंद राहील. या मार्गावर केवळ बससेवा 24 तास उपलब्ध असेल.भाविकांना आपली खासगी वाहने नांदुरी येथे पार्क करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.





