Santosh Patil – जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या योजना खास करुन महिला व बालकांसाठी आहेत. त्यांच्यासाठी असणाऱ्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन महिला व बालकांना दिलासा द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी आढावा घेतला. या आढावा बैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदकर, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडे निधी हा ज्या बँका शासकीय योजनांना वित्त पुरवठा करतात अशा बँकांमध्येच पैसे ठेवावेत, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, कोणत्याही आस्थापनेवर बाल कामगार काम करणार नाही यासाठी वेळोवेळी तपासणी करावी. तसेच ज्या बालकामगारांची सुटका केली आहे ते बाल कामगार सध्या काय करीत आहेत. याचीही पडताळणी करावी. बाल सुधार गृहातील मुलांसाठी छोटे कोर्ससाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी चर्चा करावी व त्यांना प्रशिक्षित करावे. बाल संगोपन योजनेची प्रलंबीत प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकाची प्रसिद्धी करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले.