Santosh Deshmukh Case : बीड पोलिसांकडून संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील फरार आरोपींविरोधात प्रसिद्धी पत्रक जारी

बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेतदेखील उमटल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे तर ३ जण अद्याप फरार आहेत. फरार आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणेला अद्याप यश आले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पोलिसांकडून फरार आरोपींविरोधात प्रसिद्धी पत्रक जारी
या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आपली जुनी शक्कल लढवली आहे. या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषीत केले आहे. यामध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे अशी फरार आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी प्रसिद्धपत्रक जाहीर करत आरोपींना फरार घोषित केले आहे. आरोपींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देखील देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.
माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवणार
या पत्रकात अधीक्षक नवनीत काँवत यांच्यासह इतर पाच अधिकाऱ्यांचे नंबर प्रसिद्ध केले आहेत. हे आरोपी कुठेही दिसून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केज पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच जो व्यक्ती यांची माहिती देईल त्याचे नाव गुपित ठेवले जाईल तसेच त्याला योग्य ते बक्षीस दिले जाणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आले होते. ते ज्या गाडीनं प्रवास करत होते, त्या गाडीला थांबवून सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले. यानंतर त्यांना जबर मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत.
सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
या हत्या प्रकरणात सरकारकडून SIT स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये IPS बसवराज तेलींसह 10 पोलीस अधिकारी असणार आहेत. आयपीएस बसवराज तेली हे या समितीचे नेतृत्व करणार आहेत. बसवराज तेली सीआयडीमधील आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत. एसआयटीमध्ये सर्वच अधिकारी बीड जिल्ह्यातले आहेत.





