बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सध्या अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराडला हायकोर्टाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. वाल्मिक कराडविरोधात ईडी चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. तसेच याचिकाकर्त्याला कोर्टाकडून 20 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हाच नव्हे तर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांनी केली असल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर वाल्मिक कराडची संपत्ती आणि त्याचे अनेक कारनामे समोर आले. त्यानंतर वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर या हत्या प्रकरणी मकोका लावण्यात आला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी वाल्मिक कराडची ईडी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. मात्र, हायकोर्टाने ती याचिका फेटाळून लावली. कोर्टाकडून याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांना स्वैर याचिका दाखल केल्याबद्दल 20 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. यानंतर तिरोडकर यांच्या वकिलांनी याचिका माघारी घेण्याचं मान्य केले. कोर्टाने का फेटाळली याचिका? याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्याची मागणी करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरांनी जनहित याचिका दाखल केली होती. मात्र याचिकाकर्त्यांचा हेतू याचिकेतून स्पष्ट होत नसल्यानं याचिका सुनावणीस योग्य नसल्याचं मत मुख्य न्यायमूर्तींचा व्यक्त करत सुनावणीस नकार दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत सुरू करण्याचीही मागणी याचिकेतून करण्यात आली होती. या प्रकरणात एका कॅबिनेट मंत्र्याचं नाव सातत्यानं येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात अनेक मर्यादा येत असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला. या प्रकरणी मंत्री महोदयांशी संबंधित अनेक कंपन्या आणि मालमत्तासमोर येत असल्यानं याचिकेत निवडणूक आयोगालाही प्रतिवादी करण्यात आले होते.